ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्षे करा - अजित पवार


नागपूर 10/7/2018 - राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे करावी आणि तसा निर्णय लवकरात लवकर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी एका लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. सरकारने मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक बोलवावी आणि जोपर्यंत सदस्य समाधानी होत नाहीत, तोपर्यंत ही लक्षवेधी सूचना राखून ठेवावी, अशी मागणी झाल्यानंतर तालिका अध्यक्षांनी ही लक्षवेधी सूचना राखून ठेवत असल्याचे जाहीर केले.

राज्यात १ कोटी २५ लाख इतकी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेला आदेश अत्यंत बोगस आहे. यातल्या एकाही निर्णयाची अंमलबजावणी केली गेली नाही. त्यामुळे या आदेशाचा ज्येष्ठ नागरिकांना काहीही उपयोग झाला नाही, असा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला. सरकार येत्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी उपाययोजना आखणार आहे का, यासंदर्भात सरकारने मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक बोलवावी. जोपर्यंत सदस्य समाधानी होत नाहीत, तोपर्यंत लक्षवेधी राखून ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी ही लक्षवेधी सूचना राखून ठेवत असल्याचे जाहीर केले.