Type Here to Get Search Results !

कर्नाक पुलाच्या पुनर्बांधकामाची संकल्पचित्रे 'आयआयटी'कडून तपासणार


मुंबई - मस्जिद बंदर येथील कर्नाक पुलाच्या पुनर्बांधकामाची संकल्पचित्रे आणि संरचनात्मक आराखड्यांची पवई येथील 'आयआयटी-बॉम्बे' यांच्याकडून फेरतपासणी करण्यात येणार आहे. पालिकेच्या पूल विभागाच्या प्रमुख अभियंत्यांकडून याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. या फेरतपासणीसाठी महापालिका 'आयआयटी'ला १५ लाख रुपये मोजणार आहे.

कर्नाक पूल हा १४५ वर्षे जुना झाला असून, तो मध्य रेल्वेद्वारे वापरण्यासाठी असुरक्षित घोषित केला आहे. त्यामुळे या पुलाची पुनर्बांधणी तातडीने करणे गरजेचे आहे. या पुलाच्या कामांचा आराखडा, नियोजन, संकल्पचित्रे, अंदाजपत्रक आणि मसुदा निविदा बनवण्यासाठी टीपीएफ इंजिनीयरिंग प्रा.लि. या तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली आहे. ७ एप्रिल २०१६ रोजी मध्य रेल्वेने सर्वसाधारण व्यवस्था आराखडा (जीएडी/टीएडी) मंजूर केला असून, त्यानुसार पुलाच्या पुनर्बांधणीकरता २८ डिसेंबर २०१६ रोजी स्थायी समितीने संमती दिली आहे. पुनर्बांधणीचे काम महापालिका करणार असून, तांत्रिक सल्लागाराने तयार केलेला सर्वसाधारण व्यवस्था आराखडा आणि रेल्वे प्रशासनाने दिलेल्या मंजुरीनुसार सर्व आराखडे फेरतपासणी सल्लागार 'आयआयटी'कडून तपासले जाणार आहेत. आयआयटी ही सरकारमान्य असल्याने या कामांची फेरतपासणी करण्यासाठी महापालिका १५ लाख रुपये मोजणार असून, या कामांसाठी सार्वजनिक जाहिरात न देता स्पर्धात्मक निविदा पालिकेने मागवल्या नाहीत.
Tags

Top Post Ad

Below Post Ad