कोरोनाचा धोका वाढला, सण घरातच साजरे करा - नीती आयोग

Anonymous
0


नवी दिल्ली : देशातील काही भागांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या चातुर्मासामुळे देशभरात सणवारांची रेलचेल आहे. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यादरम्यान, नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी सणांच्या काळात अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. जर आमच्याकडून थोडीशी जरी चूक झाली तरी आज जो संसर्ग नियंत्रणात दिसत आहे हो पुन्हा भयावह रूप धारण करू शकतो आणि सर्वांची मेहनत वाया जाऊ शकते.

त्यांनी सांगितले की, जर आवश्यक असेल तरच घरातून बाहेर जा. तसेच मास्कचा वापर अवश्य करा. कोरोनाचा संसर्ग संपला आहे, असा विचार करू नका. माक्स काढण्याची वेळ अद्याप आलेली नाही. कोरोनाच्या संसर्गाच्या काळात गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही घरात सण साजरे करणे अधिक सोईस्कर ठरेल. कोरोनाच्या संसर्गाचा वेग सध्यातरी थांबला आहे. मात्र आपल्याकडून दाखवली जाणारी थोडीशी बेफिकीरी हा संसर्ग वाढवू शकते. हा विषाणू जेव्हा म्युटेट होतो, तेव्हा संपूर्ण व्यवस्था हलवून टाकतो.

डॉ. पॉल यांनी यावेळी महिलांना लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, आम्हाला जेवढी अपेक्षा होती तेवढ्या प्रमाणात महिलांनी लस घेतलेली नाही. गर्भवती महिलांसाठी कोरोनाची लस खूपच आवश्यक आहे. यासह त्यांनी हेसुद्धा सांगितले की, ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी दुसरा डोसही योग्य वेळ आल्यावर अवश्य घ्यावा. नीती आयोगाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आधीही इशारा दिलेला होता. आयोगाच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट दिसून येऊ शकते. याबाबत नीती आयोगाच्या सदस्यांनी वेळोवेळी खबरदारीचा इशारा दिलेला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)