एकनाथ शिंदे यांची ‘बंडाळी’

0

मुंबई - शिवसेनेचे निष्ठावंत नेते, ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ‘बंडाळी’मुळे राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असणारे एकनाथ शिंदे पक्षावर, नेतृत्वावर नाराज का झाले, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे यांची नाराजी महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून सुरू झाली असल्याची चर्चा आहे. राज्यात भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. शिवसेनेसोबत असलेली निष्ठा आणि पक्षातील स्थान यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, त्याच वेळी उद्धव ठाकरे यांच्या हाती राज्याची धुरा गेली. मात्र, एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचे खाते देण्यात आले. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी डावलण्यात आल्याची सल त्यांच्या मनात होती.

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत खातेवाटपात महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली. ही खाती जनतेशी थेट संबंधित असल्याने पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचा त्यांचा मुद्दा होता.

राज्य सरकारमध्ये नगरविकाससह महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी आल्यानंतरही एकनाथ शिंदे यांना मनासारखे काम करू दिले जात नसल्याचे म्हटले जात होते. मंत्री म्हणून एखाद्या फाईलवर सही करण्याआधी त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनांची प्रतीक्षा करावी लागत होती, अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्यामुळेही शिंदे नाराज होते.

निधी वाटपावरूनही एकनाथ शिंदे नाराज होते. शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याने कामे पूर्ण होत नव्हती. त्याच्या परिणामी लोकांचा रोष वाढत असल्याचे त्यांनी म्हटले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)