मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द

0


मुंबई - मागील काही दिवसांपासून तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्याने तलावांत पुरेसा पाणी साठा जमा झाला आहे. आजपर्यंत ३ लाख ७५ हजार ५१४ दशलक्ष लिटर म्हणजे २५.९४ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने केलेला १० टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द केला आहे.

संपूर्ण जून महिना पावसाविना गेल्याने तलावांतील पाणी साठा कमी झाला. त्यामुळे वर्षभराच्या पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईच्या पाणीपुरवठ्यात २७ जून २०२२ पासून १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलावक्षेत्रात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना होती. मागील काही दिवसांपासून तलावक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने तलावांत पुरेसा पाणी साठा जमा झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने शुक्रवारपासून मुंबईत १० टक्के लागू केलेले पाणी कपात रद्द केले आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणा-या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत २७ जून २०२२ रोजी १ लाख ३१ हजार ७७० दशलक्ष लिटर म्हणजे ९.१० टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. शुक्रवारी, ८ जुलैपर्यंत ३ लाख ७५ हजार ५१४ दशलक्ष लिटर म्हणजे २५.९४ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला असला तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)