वाहतूक पोलिसावर हल्ला केल्यास तुरुंगवास - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वाहतूक पोलिसावर हल्ला केल्यास तुरुंगवास

Share This
वाहतूक पोलिसावर हल्ला केल्यास तुरुंगवास
मुंबई : वाहतूक पोलिसांवर कर्तव्याच्या वेळी होणार्‍या हल्ल्यांचे वाढते प्रमाण पाहता मुंबई पोलिसांनी त्यावर जालीम उपाय शोधून काढला आहे. हल्ला करणार्‍यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असून, एका वर्षाचा तुरुंगावास भोगावा लागू शकतो. भांडुप येथे नुकताच वाहतूक पोलिसावर लोखंडी रॉडने हल्ला करणार्‍या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले.

आझाद मैदानात झालेल्या हिंसाचारानंतर मुंबईत मोठय़ाप्रमाणावर पोलीस दल लक्ष्य ठरले होते. यामध्ये कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना जाणूनबुजून मारहाण किंवा त्यांच्यावर दगडफेक करण्यात येत होती. नागपाडा येथे महिला वाहतूक पोलीस आणि जे. जे. फ्लायओव्हर येथे एका वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली होती. वारंवार होणार्‍या या प्रकारामुळे पोलीस दलाचे खच्चीकरण झाले होते, मात्र नवे आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी पदभार स्वीकारताच पोलीस दलास आत्मविश्वास निर्माण झाला होता. गेल्याच आठवडय़ात एमपीडीए कायद्यान्वये भांडुप, एल बी एस मार्ग येथे वाहतूक पोलिसावर लोखंडी रॉडने हल्ला करणार्‍या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. निशांत मांजरेकर (22) आणि प्रतीक उपरकर (20) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. वाहतूक हवालदार भारत घुगेंनी विना हॅलमेट दुचाकी चालवणार्‍या या दोघांना हटकले होते. या दोघांनी काही काळानंतर घुगेंना धडा शिकवण्यासाठी मित्रांना घेऊन घटनास्थळावर धाव घेतली होती. दोघांनी घुगे यांच्यावर लोखंडी रॉडने मारहाण करत पळ काढला. जखमी अवस्थेत असलेल्या घुगेंना खाजगी रुग्णालयात उपचारानंतर सोडून देण्यात आले होते. या प्रकरणी दोषी असलेल्या मांजरेकर आणि उपरकरला ताब्यात घेऊन अटक केली असून, पोलीस त्यांच्यावर पुढील कारवाई काय करतात याकडे सर्वाचे लक्ष आहे.
     

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages