आयबीचे बनावट ओळखपत्र दाखवून व्यापार्‍याला 6 लाखांचा गंडा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आयबीचे बनावट ओळखपत्र दाखवून व्यापार्‍याला 6 लाखांचा गंडा

Share This
आयबीचे बनावट ओळखपत्र दाखवून व्यापार्‍याला 6 लाखांचा गंडा  
नवी मुंबई : इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या गुप्तहेर संघटनेचे काम करत असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून एका भामटय़ाने मुंबईतील व्यापार्‍याला सहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

प्रकाश शंकर मुल्या ऊर्फ अनू असे या भामटय़ाचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. मुंबई येथे राहणारे व्यापारी मितेश मेहता यांची काही महिन्यांपूर्वी प्रकाश मुल्या या भामटय़ाशी एपीएमसी मार्केटमध्ये ओळख झाली होती. त्या वेळी प्रकाशने आपण एपीएमसी मार्केटमधील गाळे स्वस्त दरात मिळवून देण्याचे काम करत असल्याचे सांगत आपण इंटेलिजन्स ब्युरो या गुप्तहेर संघटनेत काम करत असल्याचे ओळखपत्रही मेहता यांना दाखवले होते. परिणामी, मेहता यांचा प्रकाशवर विश्वास बसल्याने त्यांनी एपीएमसी मार्केटमध्ये गाळा विकत घेण्याची तयारी दर्शवून त्यासाठी मदत करण्याची विनंती प्रकाशला केली. प्रकाशने मितेश मेहता यांच्याकडून चेक स्वरूपात तसेच रोख अशी एकूण 6 लाखांची रक्कम घेतली.

मात्र त्यानंतर काही दिवसांनी प्रकाशने मेहता यांना टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे मेहता यांनी आपली सहा लाखांची रक्कम परत मागितली असता प्रकाशने टाळाटाळ करून त्यांचे पैसे नंतर देण्याचे आश्वासन दिले. गेल्या सहा-सात महिन्यांपासून प्रकाशकडून अशाप्रकारे टाळाटाळ केली जात असल्याने अखेर मेहता यांनी त्याच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी प्रकाशवर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages