मुस्लीम बांधवांच्या बकरी ईद सणा निमित्त मुंबई महानगर पालिकेच्या वतीने आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षते खाली नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर, पोलीस उपायुक्त गौतम, पालिका उपायुक्त सुधीर नाईक राजेंद्र भोसले, अनिल खोजे, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर चोरे,व पशुवध गृहाचे व्यवस्थापक डॉ. देठे इत्यादी मंडळी उपस्थित होती. या बैठकीमध्ये देवनार पशुवध गृह येथे जवळपास २ लाख जनावरांची कुर्बानी दिली जाते. ईद व त्यानंतर २ दिवस येथे व्यापारी व खरेदीदार यांची गर्दी असते यासाठी २१० सुरक्षारक्षक, १३ मंडप ७ टेहळणी मनोरे, पाणीपुरवठा करण्यासाठी ८ पाणपोई ५० नळांची जनावरांसाठी ४० अतिरिक्त टाक्यांची, दवाखान्यांची सोय केली जाणार आहे, स्वचतेसाठी १८० श्रमिक व अशासकीय संस्थांचे कामगार नेमण्यात एणार आहेत तसेच २ सुलभ व ५ भ्रमण शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पालिकेने १२ ऑक्टोबर ला प्रसिद्धी पत्रक काढून सांगितले होते.
परंतु पालिकेने ईद साठी पालिका सज्ज असे म्हटले असले तरी शनिवारी पालिकेतील विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम यांनी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवक व पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांसह देवनार पशुवध गृहाला भेट देवून पालिकेने केलेला दावा फोल असल्याचे दाखवून दिले आहे. या ठिकाणी भेट दिल्यावर कित्तेक अश्या समस्या निदर्शनास आल्या कि हिंदू धर्मियांच्या सणावेळी पालिका ज्या सुविधा पुरविते त्याप्रमाणात मुस्लीम धर्मियांच्या सणावेळी तितक्याच व तशाच सुविधा पुराविण्यामध्ये पालिकेकडून भेद केला जातो असे निदर्शनास आले आहे. ६४ एकर मध्ये पसरलेल्या देवनार पशुवध गृहामध्ये शनिवारी यथे १ लाख ४७ हजार बकऱ्यांची नोंद झाली आहे. पालिकेला यामाधुने २७ लाखाचा महसूल मिळाला असला तरी येथे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा पाहिल्यावर पालिकेची व सत्ताधार्यांची मुस्लीम बांधवासाठी असलेली मानसिकता लक्षात येत आहे.
पालिकेने बकऱ्यांची योग्य सोय केलेली आहे असे म्हटले असले तरी येथे बकऱ्या ठेवण्यासाठी योग्य सोय नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही लोकांनी मोजक्या बकऱ्या ठेवून संपूर्ण परिसर व्यापलेला असल्याने नव्याने येणाऱ्या व्यापाऱ्यांना रस्त्यावरच आपल्या बकऱ्या ठेवाव्या लागत आहेत. येथे ज्या व्यापाऱ्यांना हवी तितकीच जागा देवून इतर व्यापार्यांना जागा द्यावी अशी मागणी केली जात आहे परंतु येथील प्रशासन व स्थानिक व्यापारी यांच्या संगनमताने मोजक्या बकऱ्या विकल्यावर ही जागा २५ ते ६० हजार रुपयांना विकली जाते. यामुळे कर्मचारी आणि स्थानिक व्यापाऱ्यांची येथे चालती असते.
पालिकेने येथे जनावरांसाठी डॉक्टर नेमणार असल्याचे म्हटले आहे. आताच येथे जनावरांनी देवनार पशुवध गृह भरायला आले आहे. ४ दिवस प्रवासामधून आणलेल्या बकऱ्याना सर्दी झाल्याचे निदर्शनास येत आहे. या बकऱ्यांची खरेदी विक्री सुरु झाली तरी पालिका प्रशासन झोपलेले असल्याने या बकऱ्या शहरामध्ये पोहचल्या आहेत. या आजारी बकऱ्या मुळे शहरामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालिकेचे डॉक्टर येथे नसल्याने काही खाजगी डॉक्टर ज्यांच्याकडे कोणतेही प्रमाणपत्र नाही असे लोक येथे जनावरांना औषधे व इंजेक्शन देत आहेत. यासाठी १५० ते ३५० रुपये आकारले जात आहेत. हे बोगस डॉक्टर इथे आले कसे याचे कोणतेही उत्तर प्रशासनाकडे नाही. बोगस डॉक्टर येथे खुलेआम धंदा करत आहेत. सुरक्षा रक्षकांनी आत सोडल्या शिवाय हे बोगस डॉक्टर आत कसे येतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पालिकेने या ठिकाणी बकऱ्याच्या शेडसाठी ८० लाख रुपये मंजूर केले आहेत परंतु हा निधी कुठे गेला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पालिकेने येथे शुद्ध पाण्यासाठी नळांची सोय केली आहे असे म्हटले आहे परंतु येथे तुडूंब भरलेल्या गटाराच्या बाजूने घाणीमध्ये जनावरांसाठी आणि स्वतासाठी पाणी भरावे लागत आहे. व्यापाऱ्यांना छोट्याश्या टाकीमध्ये पाणी घेवून आंघोळ करणे कपडे धुणे इत्यादी सारखे प्रकार रस्त्यावरच करावे लागत आहेत. येथे एकच शौचालय आढळले या मधेही लोकांना सुविधा देण्यापेक्षा पैसे कमवण्यासाठी हे शौचालय होते असे म्हणावे लागेल .या शौचालयाच्या बाहेर सर्वत्र घाण आणि दुर्गंधी पसरली होती या घाणीमध्ये धार्मिक कुर्बानीसाठी आणलेले बकरे ठेवण्यात आले होते. पशुवध गृहामध्ये रस्त्यांवर सर्वत्र कचरा साचलेला होता कित्तेक दिवस हा कचरा उचललाच नसल्याचे दिसत होते, याच कचर्यात मेलेल्या बकर्या टाकण्यात आल्या होत्या यामुळे येथे रोगराई पसरवण्यास पालिका प्रशासन हातभार लावत असल्याचे दिसत होते.
सदर भेट संपन्न झाल्या नन्तर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम यांनी देवनार पशुवध गृहामध्ये अंधाधुंदी कारभार चालू असल्याचा आरोप केला आहे. येथे येणाऱ्या व्यापार्यांना योग्यरीत्या जागा दिल्यास नव्याने येणाऱ्या व्यापाऱ्यांची फसवणूक होणार नाही तसेच पालिकेचे उत्पन्न सुद्धा वाढेल. प्रशासनाच्या कारभारामुळे येहे लोकांना तंकारणे पाणी विकत घ्यावे लागत आहे, दवाखाने डॉक्टर नसल्याने जनावरांसाठी बोगस डॉक्टरांकडून जास्त किमतीत औषधे घ्यावी लागत आहेत. शौचालयांची योग्य सोय नसल्याने येथे येणाऱ्या लोकांचे पालिका पशासानामुळे हाल होत असल्याचे म्हटले आहे. तर येथील व्यवस्थापक डॉक्टर देठे यांनी अतिरिक्त शेड बांधून ज्या तृती राहिल्या आहेत त्या दुरुस्त करून व्यापारी व नागरिकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयतन करू, अनधिकृत डॉक्टरांची औषधे जप्त केली आहे बोगस डॉक्टरांवरही कारवाही केली जाईल असे सांगितले आहे. तरीही पालिका प्रशासनाने मुस्लीम बांधवांच्या धार्मिक भावना समजून घेवून कोणताही भेद न करता हिंदू धर्मियांच्या सणाच्या वेळी जश्या सोयी सुविधा दिल्या जातात तशाच प्रतीच्या सुविधा मुस्लीम धर्मीयांच्या बकरी ईद या सणावेळी देण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो. 9969191363



No comments:
Post a Comment