मुंबई : शहरातील नामांकित विल्सन कॉलेजच्या प्राचार्याकडे 10 लाखांची खंडणी मागून या कॉलेजविरुद्ध बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करणार्या एका साप्ताहिकाच्या मालकाला मरिन लाइन्स पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. अरविंद तिवारी असे या मालकाचे नाव असून याप्रकरणी संपादक रघुनाथ किसन ढेकळे यांचा शोध पोलीस घेत आहेत. हे दोघे 'आदर्श महाराष्ट्र'नावाचे साप्ताहिक चालवत असून या साप्ताहिकात विल्सन कॉलेजच्या जॉन विल्सन एज्युकेशन ट्रस्टविरुद्ध आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर छापला होता,असे पोलिसांनी सांगितले.
विल्सन कॉलेजविरुद्ध बदनामीकारक मजकूर छापून या साप्ताहिकाच्या प्रतीचे वाटप हे दोघे विद्यार्थ्यांमध्ये करून त्याद्वारे कॉलेजची बदनामी करत असत. यामुळे कॉलेजची नाहक बदनामी होत असे. या साप्ताहिकाचे मालक तिवारी व संपादक ढेकळे यांनी कॉलेजचे प्राचार्य विश्वास सिखय्या यांच्याशी संपर्क साधून हे प्रकरण मिटवायचे असल्यास दरवर्षी 30 विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश द्यावा लागेल व कॉलेजच्या जिमखान्यावर आपल्या ओळखीच्या संस्थांना विनामूल्य वापरण्यास द्यावा,अशी मागणी केली. त्याशिवाय दहा लाखांच्या खंडणीची मागणी या दोघांनी केली.
या प्रकरणी कॉलेजचे प्राचार्य सिखय्या यांनी मरिन लाइन्स पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव कोलेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने साप्ताहिकाच्या मालक तिवारी याला अटक केली. त्याच्यावर धमकी देणे व बदनामीकारक मजकूर छापणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या साप्ताहिकाचा संपादक ढेकळे फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ढेकळे हे मस्जिद बंदर येथे राहात असून तिवारी हा उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे राहणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले.


No comments:
Post a Comment