मुंबई : पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे सात नगरसेवक 29 नोव्हेंबरला शिक्षण समिती सभेत अनुपस्थित राहिल्याबद्दल या नगरसेवकांना पालिका सभागृह नेते यशोधर फणसे यांनी नोटीस पाठविली असून येत्या चार दिवसांत आपल्या अनुपस्थितीचे कारण लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश या नोटिसांद्वारे देण्यात आले आहेत.
गुरुवार,29 नोव्हेंबर रोजी शिक्षण समिती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यात येणारी होती;परंतु शिवसेनेचे नगरसेवक यामिनी जाधव,कोमल जामसंडेकर,अनिल निंबाळकर,शुभदा पारकर,सुनयना पोतनीस,सुप्रभा फातर्फेकर तसेच नामनिर्देशित नगरसेवक प्रमोद शिंदे हे शिक्षण समिती सभेस गैरहजर राहिल्याने सभेचा कोरम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे शिक्षण समिती अध्यक्ष विठ्ठल खरटमोल यांना कोरम अभावी ही सभा तहकूब करावी लागली. परिणामी,बाळासाहेब ठाकरे यांना शिक्षण समितीच्या वतीने श्रद्धाजंली वाहता आली नाही. दरम्यान,या प्रकरणाची गंभीर दखल सभागृह नेते यशोधर फणसे यांनी घेतली आहे. शिक्षण समिती सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे गणसंख्येअभावी बाळासाहेबांच्या दुखवटय़ाचा प्रस्ताव मांडता आला नाही. त्यामुळे या सर्व गैरहजर असणार्या सदस्यांना जबाबदार धरत सभागृह नेत्याने चार दिवसांत अनुपस्थितीचे लेखी कारण कळविण्याचे आदेश दिले आहेत.


No comments:
Post a Comment