सरकारविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सरकारविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव

Share This

शिवसेनेची दबावनिती 
मुंबई : केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकार एफडीआयच्या मुद्दय़ामुळे अस्थिरतेत सापडले असताना शिवसेनेने राज्यातील आघाडी सरकारविरुद्ध अविश्वास ठरावाची सूचना दिली असून आगामी नागपूर अधिवेशनात दबावाची रणनीती म्हणून अविश्वास ठरावाचा वापर करण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालवला आहे. शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई यांनी अविश्वास प्रस्तावाची सूचना दिली असून या 'अविश्वास'ठरावाबाबत मित्रपक्ष असणार्‍या भाजपालाही विश्वासात घेतलेले नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मारकावरून काँग्रेस व शिवसेनेत सध्या कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसने या प्रस्तावित स्मारकाला तीव्र विरोध केला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्क मैदान उपलब्ध करून दिल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही अडचणीत आले आहेत. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने राज्यातील आघाडी सरकारविरुद्ध पुरेसे संख्याबळ नसतानाही अविश्वास ठराव दाखल करून सर्वानाच चकित केले आहे. शिवसेनेच्या 29 आमदारांच्या स्वाक्षर्‍या असलेली अविश्वास ठरावाची नोटीस शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांनी 26 नोव्हेंबर रोजी दिली आहे. आगामी नागपूर अधिवेशनात हा अविश्वास ठराव प्रत्यक्षात मांडला जाईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात असून दबावाच्या राजकारणासाठी या ठरावाचा वापर करण्याची रणनीती शिवसेनेने आखली असल्याची चर्चा आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या अविश्वास ठरावाबाबत मित्रपक्ष भाजपाने कानावर हात ठेवले असून आपल्याला याची कोणतीही माहिती नसल्याचे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages