सत्ताधारी पक्षाकडून आंबेडकरी जनतेची बोळवण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 March 2013

सत्ताधारी पक्षाकडून आंबेडकरी जनतेची बोळवण


मुंबई : सत्ताधारी पक्षाने सन २0१२-१३ च्या मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेल्या वचननाम्यात दादर येथील इंदू मिलच्या जागेवर चैत्यभूमी येथे 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्याचा उल्लेख केला असला, तरी त्यासाठी सत्ताधार्‍यांनी अर्थसंकल्पात नाममात्र तरतूद करून आंबेडकरी जनतेची बोळवण केली, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते दिलीप लांडे यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या वेळी केला. 

सत्ताधारी पक्षाने खोट्या वचननाम्याच्या आधारे पुन्हा मुंबईच्या जनतेची दिशाभूल करून सत्ता काबीज केली. वचननाम्यातील कोणत्याच योजनांचा पाठपुरावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत नाही. वर्षानुवर्षे मराठी जनतेच्या भावनेला आवाहन करून त्यांच्या मतांच्या जोरावर निवडून येणार्‍या सत्ताधारी पक्षाने वचननाम्यात मराठी साहित्य भवन उभारणार, महाराष्ट्रातील लोकजीवन आणि खाद्यपदार्थ यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र भवन उभारणार आणि रंगभवन उभारणार, अशी घोषणा करण्यात आली, मात्र त्याचे पुढे काय झाले असा सवालही त्यांनी केला.

रस्त्यांच्या कंत्राटाबद्दल व एकंदरीत पालिकेच्या कारभाराबद्दल नुकतेच कॅगने त्यांच्या अहवालात सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीवर जे ताशेरे ओढले आहेत, त्याबद्दल या सत्ताधार्‍यांना पहिलावहिला 'भ्रष्टरत्न' पुरस्कार मनसेच्या वतीने मुंबईच्या जनतेतर्फे देऊ, असा टोला मनसेचे दिलीप लांडे यांनी अर्थसंकल्पावर बोलताना दिला.

चांगल्या प्रकारच्या नागरी सुविधा हे ज्याप्रमाणे मुंबईकरांचे दिवास्वप्न ठरले आहे, त्याचप्रमाणे वचननाम्यातील स्नो पार्क, मरिन अँक्वेरियम, लेझर शो, बेस्ट संग्रहालय, जंगल जिम, मुंबई आय इत्यादी बाबीदेखील दिवास्वप्नच राहणार असल्याचे सांगत लांडे यांनी मात्र युतीच्या वचननाम्याचे एक भव्यदिव्य संग्रहालय लवकरच मुंबईत पाहावयास मिळेल, असे सांगत या संग्रहालयात वचननामे धूळखात पडलेले दिसतील व त्यावरील धूळ झटकायलादेखील युतीच्या नेत्यांना वेळ नसेल, असा टोला दिला.

वचननाम्यातील कोणत्याच योजनांचा पाठपुरावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत नाही; परंतु बेरोजगार अभियंत्यांना पालिकेत कंत्राट देण्याच्या योजनेचा पाठपुरावा स्थायी समिती अध्यक्ष करताना दिसतात. यामध्ये त्यांची दूरदृष्टी दिसत असून युतीची सत्ता गेल्यावर अध्यक्ष बेकार होतील व त्या वेळी या योजनेमध्ये अभियंता असलेल्या अध्यक्षांनाही कंत्राट मिळविता येईल, असा चिमटा लांडे यांनी यावर बोलताना काढला.

या वेळी लांडे यांनी मग उपयोग काय अशी कविता सादर केली. 
रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात २३00 कोटींची तरतूद, पण रस्त्यांवर खड्डे मग उपयोग काय?

पर्जन्य जलवाहिन्यांसाठी अर्थसंकल्पात १४00 कोटींची तरतूद, पण पावसाळ्यात मुंबई तळमळ.. मग उपयोग काय?

घनकचरा व्यवस्थापनासाठी अर्थसंकल्पात १९00 कोटींची तरतूद, पण रस्त्यावरील कचरा कायम.. मग उपयोग काय?

आरोग्य अर्थसंकल्पात २५00 कोटींची तरतूद, पण मुंबईकर साथीच्या रोगांनी पछाडलेले.. मग उपयोग काय?

बाजार खात्यासाठी १२९ कोटींची तरतूद, पण मंडयांची अवस्था बकाल.. मग उपयोग काय?

झोपडपट्टय़ांमध्ये सेवासुविधा पुरविण्यासाठी १९0 कोटींची तरतूद, पण झोपडपट्टीतील जनता बेजार .. मग उपयोग काय?

शिक्षणासाठी १८७९ कोटींची तरतूद, पण शिक्षणाचा व शाळेतील सुविधांचा दर्जा सुमार.. मग उपयोग काय?

पालिका अर्थसंकल्प २७५00 कोटींचा, पण खर्चच होणार नसेल तर.. मग उपयोग काय?

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad