साकीनाका येथील के. डी. कंपाऊंडमध्ये ऍल्युमिनियम वस्तू बनविण्याच्या कारखान्यातील कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या स्फोटाच्या दणक्याने कारखान्याची भिंत शेजारील घरावर कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले. या दुर्घटनेत दोन कामगारांसह मंगेश पटेल जखमी झाला असून कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खैराणी रोडवरील के. डी. कंपाऊंडमध्ये अनेक व्यावसायिक गाळे आहेत. या गाळ्यांमध्ये दिवसरात्र काम चालते. यापैकी ऍल्युमिनियमच्या वस्तू बनविण्याच्या गाळ्यामधील मशिनचे तापमान प्रचंड वाढल्याने मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रचंड स्फोट झाला. या स्फोटाने शेजारीच राहणार्या पटेल कुटुंबीयांच्या घराची भिंत कोसळली. गाढ झोपेत असलेले पटेल कुटुंबीय त्याखाली गाडले गेले.
सुखा पटेल (६३) यांच्यासह गणेश (४०), भारती (३५), मनीषा (१५) आणि नेहा (१३) यांचा जागीच मृत्यू झाला तर स्फोट होताच घराबाहेर पळाल्याने मंगेश (३०) थोडक्यात बचावला. त्याच्या हाताला आणि कपाळाला भाजले असून राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटामुळे अमित हरीजन (२७) आणि भाईलाल (२५) हे दोन कामगार ९० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी दिली. महापौर सुनील प्रभू यांनी घटनास्थळी जावून जखमींची आणि मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस केली.
No comments:
Post a Comment