मुंबई / केतन खेडेकर http://jpnnews.webs.com
जीवनात कायमच प्रत्येक माणसाने ज्ञानार्जन करणे महत्त्वाचे आहे. ज्ञान हे दोन प्रकारचे असते, त्यात व्यावसायिक आणि जगण्यासाठीचे ज्ञान असे दोन गट पडतात. जीवनात जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आपल्या भाषणात मांडले .
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या 115 व्या वार्षिकोत्सवाच्या व्यासपीठावर अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. दादर येथील शारदा मंगल सभागृहात हा वार्षिकोत्सव पार पडला. या कार्यक्रमात श्री कोत्तापल्ले यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अखिल आजीवन सभासदत्व बहाल करण्यात आले.
प्रत्येकाने आपले जगणे समृद्ध करण्यासाठी वाचन केलेच पाहिजे. मराठी आणि त्याचप्रमाणे इतर भाषेतील साहित्यसंपदाही अमूल्य आहे. त्यामुळे समाजवास्तव, चौफेर विचार आणि प्रगत होणारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र या सगळ्याच्या ज्ञानासाठी वाचन केले पाहिजे. आत्ताच्या लहान मुलांमध्ये वाचनाचे बीज रुजविण्याची भूमिका प्रत्येक कुटुंबाने घेतली पाहिजे, असे मत डॉ. कोत्तापल्ले यांनी आपल्या भाषणातून सांगितले तसेच वार्षिकोत्सवात 'ज्ञानाधारित समाज आणि ग्रंथालये' या विषयावर डॉ. कोत्तापल्ले यांनी आपले परखड विचार मांडले.
या वार्षिकोत्सवात डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते नटवर्य केशवराव दाते पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना सन्मानित करण्यात आले. नटवर्य मामा पेंडसे पुरस्काराने मायलेकी नाटकासाठी संजय पाटील आणि शर्मिष्ठा राऊत यांना सन्मानित करण्यात आले; तसेच डॉ. हरीश सदानी यांना कवी प्रफुल्लदत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमात वर्षभरातील केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या शाखेतील कर्मचार्यांचा सत्कारही करण्यात आला.
No comments:
Post a Comment