'उपरा'कार लक्ष्मण मानेंवर बलात्काराचा गुन्हा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'उपरा'कार लक्ष्मण मानेंवर बलात्काराचा गुन्हा

Share This

भारतीय भटके-विमुक्त विकास व संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी बलात्कार केल्याची तक्रार आश्रमशाळेत काम करणार्‍या एका स्वयंपाकी महिलेने पोलीस ठाण्यात नोंदविली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर आश्रमशाळेतील इतर दोन स्वयंपाकी महिलांनीही माने यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. माने यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सातारा जिल्ह्यातील जकातवाडी येथे भारतीय भटके-विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वतीने शारदाबाई पवार आश्रमशाळा चालविण्यात येते. या संस्थेचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे अध्यक्ष असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  खा. सुप्रिया सुळे या संचालक म्हणून काम पाहतात. या संस्थेच्या कार्याध्यक्षपदाचा कार्यभार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्याकडे आहे. या संस्थेच्या वतीने जकातवाडी येथे चालविण्यात येणार्‍या आश्रमशाळेत स्वयंपाकासाठी काही महिला नियुक्त करण्यात आल्या आहेत. यापैकी एका स्वयंपाकी महिलेने पद्मश्री लक्ष्मण माने यांनी असहाय्यतेचा गैरफायदा घेत वेळोवेळी बलात्कार केल्याची तक्रार रविवारी मध्यरात्री सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली. मी २00३ सालापासून शारदाबाई पवार आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून काम करत आहे. 

या काळात पद्मश्री लक्ष्मण माने यांनी मला नोकरीत पर्मनंट करतो, १५ ते १६ हजार पगार देतो असे म्हणत माझ्या म्हणण्यानुसार वागणार नसशील तर तत्काळ दीड लाख भर आणि नोकरी टिकव असे सांगितले. पैसे भरणे मला शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर माझ्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत माने रेस्टहाऊसच्या दुसर्‍या मजल्यावरील खोलीत माझ्यावर पुन्हा बलात्कार केला. २00३ ते २0१0 या काळात लक्ष्मण माने यांनी माझ्या असहाय्यतेचा फायदा घेत जकातवाडी येथील जावयाच्या घरात, पुणे येथील रेस्टहाऊस व आश्रमशाळेतील धान्य कोठारात वारंवार बलात्कार केल्याचे त्या पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर आश्रमशाळेत काम करणार्‍या इतर दोन स्वयंपाकी महिलांनीही माने यांनी आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात केली. यानुसार त्या महिलांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी पद्मश्री लक्ष्मण माने यांची चौकशी सुरू केली असून तक्रारीत नोंदविलेल्या जकातवाडी येथील घटनास्थळांचा पंचनामा केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages