बाबासाहेबांचे विचार देशभर पोहचविण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बाबासाहेबांचे विचार देशभर पोहचविण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध - मुख्यमंत्री

Share This


युवापिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची माहिती व्हावी यासाठी त्यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यात येत आहे. तसेच ज्या व्यक्ती किंवा संस्थाकडे बाबासाहेबांचे हस्तलिखित आहेत, त्यांनी ते राज्य शासनाला द्यावेत, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले असून बाबासाहेबांचे विचार देशभर पोहचविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

मुख्यमंत्री चव्हाण आज नागपूरच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्री चव्हाण व केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री अजित सिंग यांच्या हस्ते विमानतळावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर ते दीक्षाभूमीवर आले आणि परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. 

याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, नव्या पिढीला बाबासाहेबांचे विचार कळावेत आणि ते देशभर पोहचावेत म्हणून उपलब्ध हस्तलिखित प्रकाशित करण्यास शासनाचा अग्रक्रम आहे. प्रकाशित केलेल्या साहित्यात काही त्रृटी असल्यास त्यात दुरुस्ती केल्या जाईल. याशिवाय ज्या व्यक्ती आणि संस्थांकडे बाबासाहेबांचे हस्तलिखित आहेत, ते त्यांनी शासनाला उपलब्ध करुन द्यावेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दैनदिन वापरातील वस्तूंचे जतन करण्यात येत आहे. याशिवाय फुटाळा तलाव येथील बुद्धिष्ट पार्कला विलंब होत असला तरी ते काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे असा राज्य शासनाचा मानस असून त्यानुसार कामे करण्यात येतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील सर्व आंबेडकरी जनतेला याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी रोहयो मंत्री डॉ.नितीन राऊत, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, खासदार विलास मुत्तेमवार, आमदार दिनानाथ पडोळे, जयप्रकाश गुप्ता, स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, विलास गजघाटे, नारायणराव सुटे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages