मध्य वैतरणा धरण पूर्णत्वाच्या मार्गावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 May 2013

मध्य वैतरणा धरण पूर्णत्वाच्या मार्गावर


धरणाचे ९४ टक्के काम पूर्ण 
येत्या पावसाळ्यात मुंबईला ४५५ दशलक्ष लिटर पाणी
मुंबई : मुंबईतील भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात कोचाळे येथे उभारण्यात येणारे मध्य वैतरणा धरणाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या पावसाळ्यात धरणाच्या जलसंचय क्षेत्रामध्ये पूर्ण क्षमतेने पर्जन्य संचय करण्याच्या दृष्टीने मनपाने नियोजन केले आहे. त्यामुळे मुंबई शहराला प्रतिदिन ४५५ द.ल.लि. अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मध्य वैतरणा धरणाच्या ठिकाणी भेट देऊन धरणाचे काम व नवीन पुलाच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी मुंबईचे महापौर सुनील प्रभू, सभागृह नेते यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आदींसह इतर सदस्य उपस्थित होते.

मुंबईला विहार, तुळशी, तानसा, निम्न वैतरणा, उध्र्व वैतरणा आणि भातसा या तलावांतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र पाणीपुरवठय़ाची मागणी आणि प्रत्यक्ष पाण्याचा पुरवठा यामध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत आहे. त्यामुळे मुंबई मनपाने वैतरणा नदीवर आर.सी.सी. पद्धतीने मध्य वैतरणा धरण बांधले आहे. उध्र्व व निम्न वैतरणा धरणांदरम्यान मध्य वैतरणा धरण आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत ६७८.५६ कोटी आहे. धरणाच्या पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा करण्यात धरण क्षेत्रातील जुन्या पुलाचा अडथळा होता. मात्र तो सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रखडलेल्या नवीन पुलाचे काम येत्या दिवसात पूर्ण करून देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दौर्‍यादरम्यान दिली.


धरण परिसरातील ग्रामस्थ तहानलेलेच
धरण परिसरातील तीन गावांतील ग्रामस्थ पुरेसे पाणी मिळत नसल्याने तहानलेलेच आहेत. या ग्रामस्थांना वीज, मुलांसाठी शाळा, शिक्षक व साधा कच्चा रस्ताही उपलब्ध नसल्याची विदारक सत्यकथा तेथील ग्रामस्थांनी गुरुवारी पुढार्‍यांसमोर व्यक्त केली. पालिका पाण्यासाठी सहकार्य करेल. मात्र सरकारनेही रस्ता, शाळा, पाण्यासाठी आपली प्रमुख जबाबदारी म्हणून मदत करायला हवी, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मध्य वैतरणा धरणाच्या देखाभाल, दुरुस्ती व सुरक्षिततेचे काम पाहणार्‍या कर्मचार्‍यांना घरे उपलब्ध करण्याबाबत पर्यावरण खाते अद्याप परवानगी देत नसल्याची तक्रार उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली.

आणखी तीन धरणे उभारणार
मुंबईला मध्य वैतरणाचे ४५५ दशलक्ष लिटर पाणी मिळाल्यानंतरही लोकसंख्या व मागणीतील एक हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज भागवण्यासाठी पालिका गारगाई, पिंजाळ व दमणगंगा ही तीन धरणे उभारणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ही तीन धरणे उभारली तर भविष्यात संपूर्ण मुंबईला चोवीस तास पाणी देता येईल, असेही ते म्हणाले.

धरण परिसरात वीज प्रकल्प
मध्य वैतरणा धरण प्रकल्पाच्या ठिकाणी ७00 कोटी रुपये, तर नवीन पुलासाठी २0 कोटी २0 लाख रुपये पालिकेने खर्च केले आहेत. मुंबईकरांना वीजपुरवठा करण्यासाठी धरण परिसरात वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून राज्य शासनाने वीज प्रकल्पात खोडा आणू नये, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. तसेच हा प्रकल्प पालिकाच उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad