सीएसटी ते गीतानगर बस सुरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सीएसटी ते गीतानगर बस सुरू

Share This

मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गीतानगर या मार्गावर बस क्र. १३९ ही बस शुक्रवारपासून सुरू झाल्यामुळे दीड वर्ष या बससाठी आतूरतेने वाट पाहणार्‍या गीतानगर येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. 

या ठिकाणी नौदलाची नेव्ही नगर ही वसाहत असल्याने गेल्या दीड वर्षापूर्वी सुरक्षिततेच्या कारणास्तव ही बस नौदलाकडून बंद करण्यात आली होती. मात्र याच रस्त्यावर टॅक्सी तसेच इतर खाजगी गाड्यांना प्रवेश असताना बेस्ट बसलाच विरोध का केला जात आहे, असा सवाल येथील नागरिकांकडून विचारला जात होता. नौदलाकडून या बसला परवानगी नाकारल्यामुळे दीड वर्ष गीतानगर येथील सुमारे १0 हजार वस्ती असलेल्या भागातील लोकांना दीड कि.मी.ची पायपीट करून अफगाण चर्च येथे उतरावे लागत होते. 

ही बेस्ट बस पुन्हा सुरू करण्यासाठी स्थानिक नगरसेवकापासून आमदार, खासदारांनी प्रयत्न केले होते. याबाबत थेट पंतप्रधानापर्यंत चर्चा करून या रस्त्यावर बेस्ट बस चालवण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी केली गेली होती.
नेव्ही नगरच्या बाजूने जाणारा हा रस्ता खाजगी असल्याने तसेच नौदलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नौदलाकडून बेस्ट बस चालवण्यासाठी परवानगी नाकारली जात होती. या भागातील लोकांचा त्रास समजून घेऊन स्थानिक खासदार मिलिंद देवरा यांच्या प्रयत्नाने तीन महिन्यांची परवानगी मिळाली असून त्यामुळे किमान तीन महिन्यांसाठी येथील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages