'जी-मेल'चा चेहरा बदलणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'जी-मेल'चा चेहरा बदलणार

Share This
वॉशिंग्टन : कार्यालय, खाजगी काम आणि प्रशासकीय कामांकरिता दैनंदिन सवयीचा झालेल्या 'जी-मेल'चा संपूर्ण चेहराच बदलणार आहे. आतापर्यंत काही काही नवनवीन बदल घडवून चकित करणार्‍या 'गुगल'ने पहिल्यांदाच आपल्या इलेक्ट्रॉनिक मेल संकेतस्थळात मोठा बदल घडवण्याचा निर्णय घेतला आहे.

'गुगल'ने नवीन 'जी-मेल'च्या इनबॉक्सला नवीन रूप दिले आहे. त्यानुसार पूर्वीप्रमाणे सर्व प्रकारचे ई-मेल एकदाच वाचण्याची कटकट दूर होणार आहे. आपल्या इनबॉक्समध्ये आलेले ई-मेल स्वत: आपापल्या प्रकारानुसार विभाजित होतील. म्हणजेच फेसबुक किंवा इतर सोशल माध्यमांशी कनेक्ट असल्यावर येणार्‍या सूचना आणि संदेश सोशल या विभागात मोडले जातील. 'जी-मेल' खात्यातील इनबॉक्स प्रामुख्याने प्रायमरी, सोशल, प्रोमोशन्स, अपडेट्स आणि फोरम्स या ५ विभागात विभाजित होणार आहेत. प्रत्येक उपभोक्त्याला आपापल्या सोयीनुसार इतर विभागही तयार करता येतील. केवळ इनबॉक्स नव्हे, तर नव्या 'जी-मेल'च्या थीम आणि पार्श्‍वरंगांमध्येही मोठे बदल घडवण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे नवीन जी-मेल तुमच्या मर्जीप्रमाणे आकार घेणार आहे. म्हणजेच 'गुगल'ने नव्या 'जी-मेल'मध्ये 'ट्रॅक मी' ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार आपण सर्वात जास्त ई-मेल पाठवणार्‍या व्यक्ती किंवा संस्थेचे ई-मेल सर्वोच्च ठिकाणी आणि सर्वप्रथम दाखवले जातील.

'गुगल'ने हे बदल डेस्कटॉप संगणकांसाठीच नाही, तर आयफोन ऑपरेटिंग सिस्टीम आणि अँड्रॉएड मोबाईल फोन्सवरदेखील देणार असल्याचे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून कळवले आहे. येत्या काही दिवसांतच सर्वांना या नव्या 'जी-मेल'चा अनुभव घेता येणार आहे.
 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages