विद्यार्थ्यांना २७ वस्तू पहिल्याच दिवशी मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विद्यार्थ्यांना २७ वस्तू पहिल्याच दिवशी मिळणार

Share This
मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या २७ शालोपयोगी वस्तू या वर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळतील, असा दावा शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक यांनी केला आहे.

पालिकेकडून देण्यात येणार्‍या या शालोपयोगी २७ वस्तू विद्यार्थ्यांना आजपर्यंत कधीच वेळेवर मिळालेल्या नाहीत, मात्र आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपण या वस्तू शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत, असा निश्‍चय केला असून त्यासाठी २७ मे रोजी हिंदू कॉलनीत संबंधित अधिकार्‍यांबरोबर मीटिंग घेऊन तशा सूचनाही दिल्या असल्याचे कोटक यांनी सांगितले. मुळात ठेकेदारांकडून त्या वस्तू वेळेत पुरवण्यासाठी अनुकूलता असताना त्या स्वीकारण्याबाबत प्रशासकीय अधिकार्‍यांची तयारी नव्हती. त्यासाठी आपण उपशिक्षणाधिकार्‍यांना सर्व शिक्षणाधिकार्‍यांची मीटिंग घेण्यास सांगून तशा सूचना देण्यास सांगितल्याचे कोटक यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, पालिकेच्या ११५0 शाळांमधील मुख्याध्यापक किंवा जबाबदार व्यक्तींकडून सर्व २७ वस्तू स्वीकारायच्या, असे ठरले.

दरम्यान, विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या या २७ वस्तू येत्या ७ जूनलाच शाळांमध्ये जमा करण्यात येणार असून याबाबतचा अहवाल आपण मागितला असल्याचे कोटक यांनी सांगितले. या २७ वस्तूंसाठी यापूर्वीच सर्व ठेकेदारांना वर्कऑर्डर दिल्या असल्याने या वर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १७ जूनला पालिका शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या २७ शालोपयोगी वस्तू दिल्या जातील, असे मनोज कोटक यांनी खात्रीलायकरीत्या सांगितले.
चिक्कीसाठी विभागवार ठेकेदार नेमण्याची सूचना
पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सुगंधित दुधाऐवजी चिक्की देण्याचा निर्णय या वर्षीपासून घेतला गेला आहे, मात्र सुमारे चार लाख विद्यार्थ्यांना चिक्की देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी दिवसाला सुमारे १९ टन चिक्कीचा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एकाच ठेकेदाराकडून चिक्की मिळणे अशक्य झाले असल्याने चिक्कीचा पुरवठा करण्यासाठी विभागवार पुरवठादार नेमण्याच्या सूचना मनोज कोटक यांनी प्रशासनाला केल्या आहेत. त्याचप्रमाणे दररोज चिक्की खाण्याने मुलांना कंटाळा येईल, यासाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळे जिन्नस देण्याचा विचार व्हावा, अशी मागणी कोटक यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages