मुंबई – डोक्यावरून मैला वाहून नेणारे तीन हजारांहून अधिक कामगार मुंबईत कार्यरत असल्याची आकडेवारी नुकतीच केंद्र सरकारने मुंबई महापालिकेला दिली. या कामगारांचा शोध घेऊन संपूर्ण माहिती देण्याचे आदेश केंद्र सरकारने महापालिकेला दिले. मात्र, मुंबईत एकही मैलावाहू कामगार नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
देशभरात डोक्यावरून मैला वाहून नेणा-या कामगारांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत आजही डोक्यावरून मैला वाहून नेणारे सुमारे ३,०१७ कामगार आहेत. या कामगारांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांची सविस्तर माहिती देण्याचे आदेश केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सुधारणा मंत्रालयाने मुंबई महापलिकेला दिले. मुंबईतील मैला वाहून नेणा-या कामगारांचा शोध घेण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध वृत्तपत्रांतून जाहिराती दिल्या. मैला वाहून नेणा-या कामगारांसाठी शोध मोहीमही राबवली. तसेच पालिकेच्या २४ विभागीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना संपर्क करत नाव नोंदवण्याचे आवाहन केले.
मात्र, शहर आणि उपनगरांतून एकही मैलावाहू कामगार नसल्याचे पालिकेने केलेल्या आटापिट्यानंतर पुढे आले. मुंबईत सध्याच्या युगात मैलावाहू कामगार असणे अशक्य आहे. विष्टा वाहून जाण्यासाठी ड्रेनेज लाइन आहेत. त्यामुळे मुंबईत मैला कामगार नाहीत, असेच म्हणावे लागेल. तसेच एखाद्-दुसरा कामगार असला, तरी आपले काम दुस-या समोर येईल, या भीतीने ते पुढे येण्यास टाळाटाळ करत असणार. मात्र, मैलावाहू कामगार हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेही नसतील, असा दावा पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त प्रकाश पाटील यांनी केला.
No comments:
Post a Comment