एलिव्हेटेड रेल्वेवर धावणार आठ डब्यांची गाडी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एलिव्हेटेड रेल्वेवर धावणार आठ डब्यांची गाडी

Share This
एलिव्हेटेड रेल्वे
मुंबई- चर्चगेट ओव्हल मैदान ते विरार या एलिव्हेटेड कॉरिडॉरवर धावणारी रेल्वे आठ डब्यांची असणार आहे. या मार्गावर असणारी स्थानकेही काही ठिकाणी वरील बाजूस, तर काही जमिनीखाली असणार आहेत. त्यामुळेच सध्याच्या स्थितीत आठ डब्यांचीच गाडी चालवण्याचा निर्णय झाला आहे. या मार्गावर दर दोन मिनिटांनी गाडी सोडण्याचा विचार असून, त्या दृष्टीने आखणी केली जात आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा राज्य सहकार्य करारही पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.
चर्चगेट-विरार हा ६३ किलो मीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडोर २०१९ पर्यंत पूर्ण होईल. या मार्गासाठी जवळपास २४ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यावर धावणा-या गाडय़ा कशा असतील याबाबत सर्वानाच उत्सुकता आहे. तूर्तास आठ डब्यांची गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भविष्यात या गाडीचे डबे वाढण्याची शक्यताही कमी आहे. या मार्गावरील स्थानकांची लांबी मर्यादित असल्याने हा निर्णय घेतल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
प्रत्येक डब्यातून जवळपास साडेतीनशे प्रवाशी एकाच वेळी प्रवास करू शकतील. या मार्गावर एकूण २६ स्थानके असतील. त्यातील पाच स्थानके ही भूमिगत, तर २१ स्थानके ही एलिव्हेटेड असतील. दर वर्षाला पाच टक्केप्रमाणे तिकिटांचे दर वाढवण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा राज्य सहकार्य करार अजूनही झालेला नाही. मात्र याबाबत अंतिम टप्प्यात चर्चा असून पुढील महिन्यात या करारावर स्वाक्ष-या होण्याची चिन्हे आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages