चर्चगेट-विरार एलिव्हेटेड मार्गात अडथळे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चर्चगेट-विरार एलिव्हेटेड मार्गात अडथळे

Share This
एलिव्हेटेड रेल्वे
मुंबई – चर्चगेट-विरार एलिव्हेटेड कॉरिडोर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारताना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे. त्यात पर्यावरणाचे होणारे नुकसान हा प्रमुख मुद्दा असल्याचे रेल्वेने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यानुसार खाड्या, झाडे, खारफुटीची जंगले नष्ट होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात नागरिकही विस्थापित होणार असल्याने यातून मार्ग काढून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान आता रेल्वे आणि राज्य सरकारपुढे आहे.
रेल्वेशी संबंधित कोणताही प्रकल्प राबवण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून त्याचा अभ्यास केला जातो. चर्चगेट-विरार एलिव्हेटेड कॉरिडोरचा अभ्यास नुकताच करण्यात आला असून, त्याच्या अहवालात हा प्रकल्प राबवताना अनेक अडचणी येऊ शकतात, असे नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी पर्यावरणाचा मुद्दा गंभीर असून, प्रकल्प राबवताना ९१५ झाडे तोडावी लागणार आहेत. ही झाडे तोडल्यास ४४ हजार किलोग्रॅम ऑक्सिजनची होणारी निर्मिती थांबणार आहे. या झाडांची किंमत विचारात घेता २५ लाखांचे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर माहीम, नालासोपारा, भाईंदर, नायगाव येथील तीन हजार मीटरवर परसलेले खारफुटीचे जंगल नष्ट होणार आहे. तर २०० मीटर वनक्षेत्रालाही या प्रकल्पामुळे फटका बसू शकतो, असे या अभ्यास अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. तर काही ठिकाणच्या खाडय़ादेखील बुजवाव्या लागणार आहेत.
एकीकडे पर्यावरणविषक समस्या असताना दुसरीकडे या प्रकल्पासाठी जवळपास एक हजार ७७२ कुटुंबातील सात हजार जणांना विस्थापित व्हावे लागणार आहे, असे या अहवालातून समोर आले आहे. या सर्व समस्यांवर मात केल्यानंतरच हा प्रकल्प अस्तित्वात येईल. यातून कसा मार्ग काढला जातो ते येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages