मानखुर्द येथे दीड वर्षात ५२ बळी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मानखुर्द येथे दीड वर्षात ५२ बळी

Share This
मुंबई : मानखुर्द रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. २ व ३ मध्ये राहणार्‍या सुमारे पाच हजारांच्या लोकवस्तीला जाण्या-येण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग नसल्यामुळे त्यांना जीव धोक्यात घालून रूळ ओलांडून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे झालेल्या दुर्घटनेत जानेवारी २0१२ ते जून २0१३ पर्यंत दीड वर्षात तब्बल ५२ जणांचा जीव गेला आहे. याठिकाणी भुयारी मार्ग बांधण्यात यावा, यासाठी येथील रहिवासी रेल्वेकडे पाठपुरावा करत आहेत, मात्र त्याबाबत महापालिके कडून तसा प्रस्ताव येणे गरजेचे असल्याचे रेल्वेने लेखी कळवले आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने लोकांमध्ये संतापाची भावना आहे. 

मानखुर्द रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ च्या दरम्यान १९७५ सालापासून सुमारे २ हजार झोपड्यांची महात्मा फुलेनगर ही लोकवस्ती आहे. येथे सुमारे ५ हजार लोक राहतात. वस्तीच्या तिन्ही बाजूला रेल्वे ट्रॅक, तर एका बाजूला नौदलाचे निषिद्ध क्षेत्र आहे. या भागातील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी रेल्वेने कुठल्याही प्रकारे सुविधा दिलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना रेल्वे ट्रॅक ओलांडण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. शाळकरी मुले, महिला, अपंग, वृद्ध आणि इतर नागरिकांना रस्त्यावर येण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडावा लागतो. त्यात अनेकांचा बळीही गेलेला आहे. त्यातच आता मानखुर्द स्थानकात १२ डबा लोकलसाठी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात आल्यानंतर येथील रहिवाशांचा येण्या-जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होणार आहे. तसेच आग, अपघातसारख्या प्रसंगी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्याही येथे पोहोचू शकणार नाहीत, असे जय मल्हार सेवा मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ खालून रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग बांधून द्यावा आणि नंतरच प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम करावे, अशी मागणी जय मल्हार सेवा मंडळाने केली आहे. भुयारी मार्गासाठी मध्य रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहारही करण्यात आलेला आहे, परंतु एखाद्या रेल्वे स्थानकात भुयारी मार्ग बांधण्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेकडून आला पाहिजे, असा नियम असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दोन प्लॅटफॉर्मला जोडणारा पादचारी पूल रेल्वे प्रशासन बांधू शकते, पण भुयारी मार्ग, पूर्व-पश्‍चिम जोडणारा पूल बांधण्यासाठी महापालिकेच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यासाठी स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदारांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र रहिवाशांनी याबाबत मागणी करूनही लोकप्रतिनिधी कुठलीही हालचाल करत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

मरेवर लोकलखाली मृत्यू होणार्‍यांची संख्या दरवर्षी ४000 
२0१२ मध्ये मानखुर्द स्थानकात मृत्युमुखी ४३
१ जानेवारी ते जून २0१३ पर्यंत मृत्युमुखी 0९

जाण्या-येण्यासाठी कुठलाही मार्ग नसल्याने येथील रहिवाशांना रोजच्या दिनचर्येदरम्यान रूळ ओलांडून जावे लागते. इतकेच नव्हे तर फायर ब्रिगेड, रुग्णवाहिकांना सुद्धा मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे लोकांना अंत्ययात्रादेखील रेल्वे ट्रॅकमधून न्यावी लागते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages