खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून मनसेने पालिका अभियंत्यांना कोंडले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून मनसेने पालिका अभियंत्यांना कोंडले

Share This
मुंबई : दादर परिसरातील अनेक रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बृहन्मुंबई महापालिकेच्या तीन अभियंत्यांना जवळपास ६ तासांसाठी कार्यालयातच बसवून ठेवले. परिसरातील जवळपास ५0 खड्डे पुढील ४८ तासांत बुजवले जातील, अशी लेखी हमी दिल्यानंतर 'त्या' अभियंत्यांची मनसे कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाली. 

दादर परिसरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याबाबत स्थानिक रहिवासी आपल्याकडे वारंवार विचारणा करत आहेत. वास्तविक, रस्ते खड्डेमय बनण्यास पालिकेतील वरिष्ठ अधिकारी व अभियंतेच जबाबदार असल्याचा दावा नगरसेवक संदीप देशपांडे यांनी या वेळी केला. त्यांच्याच नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी जी-नॉर्थ वॉर्ड कार्यालयातील अभियंत्यांना घेराव घालून खड्डय़ांबाबत जाब विचारला. देशपांडे व त्यांच्या सहकार्‍यांनी मंगळवारी सकाळी ११.३0 च्या सुमारास वॉर्ड कार्यालय गाठले व सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत तेथेच ठाण मांडले. या वेळी त्यांनी पालिका अभियंत्यांना खड्डे बुजवण्यासंदर्भात लेखी हमी मिळेपर्यंत कार्यालयाबाहेर पडू देणार नसल्याची तंबी दिली. मनसेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने दादर परिसरातील जवळपास ५0 खड्डे पुढील ४८ तासांत बुजवले जातील, अशी लेखी हमी दिली. या हमीनंतरच तीन अभियंत्यांची मनसे कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाली. याप्रकरणी पालिका अधिकार्‍यांनी आपल्याकडे कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याचे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक परशुराम काकड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages