नायरमधील परिचारिकेचा टीबीने घेतला बळी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नायरमधील परिचारिकेचा टीबीने घेतला बळी

Share This
मुंबई - वसतिगृहातील कोंडमारा डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या जीवावर उठला आहे. छोट्याशा खोलीत पाच-सहा जणांना राहवे लागत असल्याने क्षयरोगाचा (टीबी) संसर्ग होऊ लागला आहे. नायर रुग्णालयातील एक परिचारिका विद्यार्थिनी नुकतीच टीबीने दगावली. तर एका निवासी डॉक्टर तरुणीलाही टीबीने ग्रासले आहे. 

नायर रुग्णालयातील या परिचारिका विद्यार्थिनीचा एमडीआर टीबीने मृत्यू झाला. नर्सिंगच्या तिसर्‍या वर्षाला ती शिकत होती. वसतिगृहामध्येच राहत होती. नायरमध्ये निदान झाल्यानंतर उपचारासाठी तिला शिवडी टीबी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान ती दगावली. नायरचे अधिष्ठाता डॉ. मीनू संजना यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. नायरमध्ये एमबीबीएसच्या दुसर्‍या वर्षाला शिकणार्‍या एका डॉक्टर तरुणीलाही टीबीने ग्रासले आहे. ही २६ वर्षीय डॉक्टर रुग्णालयाच्या वसतिगृहात राहते. दोन दिवसांपूर्वीच तिच्या टीबीचे निदान झाले. तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यातील २६ डॉक्टरांना टीबी झाला. तरीही सरकार निवासी डॉक्टरांसाठी आरोग्य धोरण तयार करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. संतोष वाकचौरे यांनी केला. नायरमधील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून याबद्दल निषेध नोंदवला.
 

निवासी डॉक्टरांना टीबीची लागण होऊ नये. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी त्यांना रोज ३० रुपयांचा सकस आहार सुरू केला जाणार आहे. आहारतज्ज्ञांनी त्यासाठी पोहे, उपमा, मेथी पराठा, अंडी, दूध, हॉर्लिक्स, मिसळ असे ३१ पदार्थ सुचवले आहेत. सध्या त्यांना फक्त १० रुपयांचा आहार दिला जातो.
- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, शीव रुग्णालय

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages