अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या

Share This

डॉ. दाभोलकरांच्‍या अंत्‍यदर्शनासाठी लोटला जनसागर, हत्‍येप्रकरणी दोन संशयित ताब्‍यात

हत्येचा निषेध, पुणे बंद

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज पुण्यात हत्या करण्यात आली. ओंकारेश्वर पुलाजवळ दोघा अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात दाभोलकर यांचा मृत्यू झाल्यानं पुण्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी सर्वपक्षीय पुणे बंद पुकारण्यात आला आहे. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्‍यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्‍यात गोळीबार करुन हत्‍या करण्‍यात आली आहे. गंभीर अवस्‍थेत त्‍यांना ससून रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. परंतु, उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला. पुरोगामी महाराष्‍ट्रासाठी हा मोठा धक्‍का असून या घटनेमुळे राज्‍य सुन्‍न झाले आहे. याप्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्‍या गुन्‍हे शाखेकडे सोपविण्‍यात आला आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्‍यात घेतल्‍याची माहिती आहे.

दाभोलकर यांच्‍यावर स्‍प्‍लेंडर या मोटरसायकलवरुन आलेल्‍या 2 दुचाकीस्‍वारांनी गोळीबार केला. गोळीबार केल्‍यानंतर ते रविवारपेठेच्‍या दिशेने पळून गेले. त्‍यांच्‍या गाडीचा नोंदणी क्रमांक काही प्रत्‍यक्षदर्शींनी लिहून घेतला. त्‍या आधारावर तपास करण्‍यात येत आहे. ही गाडी पुणे किंवा पिंपरी-चिंचवड भागातील असून या भागात नोंदणी असलेल्‍या सुमारे साडे सात हजार मोटरसायकलींबाबत माहिती काढण्‍यात येत आहे. त्‍यांच्‍या मालकांची चौकशी करण्‍यात येणार आहे.

मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी हत्‍येचा तीव्र शब्‍दात निषेध केला असून दाभोलकरांच्‍या मारेक-यांची माहिती देणा-यांना 10 लाख रुपयाचे बक्षीस देण्‍याची घोषणा केली आहे. पुणे पोलिसांनीही माहिती देणा-यास 1 लाख रुपये देण्‍याची घोषणा केली आहे. यासंदर्भात अधिक माहिती कळविण्‍यासाठी 9923695315 आणि 02026112222 या क्रमांकांवर संपर्क करण्‍याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त पसरताच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लोकांनी उत्फुर्तपणे रस्त्यावर उतरून या घटनेचा कडक शब्दात निषेध केला. मुंबईच्या आझाद मैदान येथे रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी दाभोलकरांच्या मारेक-यांना लवकरात लवकर अटक करून कडक शासन करण्यात यावे, हत्या करणाऱ्या संस्थेला आतंकवादी संस्था घोषित करून त्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागे कोणतीही धार्मिक संघटना असल्यास त्यावर बंदी आणण्याची मागणी केली. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. कोणत्याही विचाराचा विरोध हा विचारानेच व्हायला हवा, हत्या करणे हा योग्य मार्ग नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यातील हत्येचा निषेध नाशिककरांनी सकाळी रस्त्यावर उतरुन केला. पुरोगामी चळवळीतील संघटनांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी जेलभरो आंदोलन केले. तसेच डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी संघटनांनी केली. 

राज्याचे पुरोगामित्व संपणार नाही!- शरद पवार
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनं महाराष्ट्रातील पुरोगामित्व नष्ट होणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या मारेक-यांना शोधून काढून या हत्येमागच्या प्रवृत्तींचाही सरकारनं शोध घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज सकाळी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यानं अवघा महाराष्ट्र हादरलाय. राज्याच्या पुरोगामित्वावरचाच हा हल्ला असल्याची तीव्र प्रतिक्रिया सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून व्यक्त होतेय. हा हल्ला कुणी केला आणि कुठल्या कारणासाठी केला, याचा तपास लवकरात लवकर लागावा, अशी सा-यांचीच इच्छा आहे. या भावना लक्षात घेऊनच, राज्य सरकारनंही हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं घेतलंय.

'गांधीहत्या करणा-या विचारांकडूनच दाभोलकरांची हत्या'-मुख्यमंत्री 

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही राजकीय हत्या आहे. ज्या विचारांनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच विचारांनी आज डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला निषेध नोंदवला. मुख्यमंत्री डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते.

हिंदुत्ववादी संघटना या हत्येमागे आहेत का? असे पत्रकारांनी विचारताच ते म्हणाले, की अद्यापही या हत्येचा तपास सुरू आहे. आताच काही बोलणे योग्य होणार नाही. पण या हल्ल्यामागे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. या घटनेचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपणवण्यात आला असून, हल्लाखोरांची योग्य माहिती देणा-यास १० लाख रुपयाचे इनाम देण्यात येईल.

महाराष्ट्राला लागलेला कलंक -संजय राऊत 
दाभोलकरांची हत्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी या हत्येचा निषेध केलाय. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकावरून आमच्यात मतभेद होते, पण त्यांच्या हत्येचा आम्ही धिक्कारच करतो, असं त्यांनी नमूद केलं. 

हा सरकारी अनास्थेचा बळी- राज

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची हत्या हा सरकारी अनास्थेचा बळी आहे. ज्या कोणी हे कृत्य केले असेल ते कोणत्याही जातीचे, धर्माचे, संघटनेचे लोक असतील त्यांना अटक करून पुन्हा असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही, अशी कारवाई त्यांच्यावर केली गेली पाहिजे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

नरेंद्र दाभोळकर यांची हत्या ही एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे, असे नमूद करत राज यांनी सरकारलाही खरमरीत शब्दांत फैलावर घेतले. या घटनेनंतर आता संशयाची सुई इकडे जाते, तिकडे जाते असं सांगितलं जातंय. पण, मुळातच जादुटोणाविरोधी विधेयक जे भिजत पडलं आहे, त्याला सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे एकीकडे हे विधेयक मंजूर होत नसताना दुसरीकडे दाभोळकर यांची हत्या झाल्याने एक सुई सरकारकडेही जाते असं म्हटलं तर मग काय म्हणाल? असा सवालच राज यांनी केला.

नरेंद्र दाभोळकर जादुटोणा आणि अनिष्ट प्रथांविरूद्ध लढत होते. या लढ्याला माझा नेहमीच पाठिंबा राहिला. तसं मी त्यांना सांगितलंही होतं. ते ज्या गोष्टी सांगत होते, त्या सचित्र एखाद्या पुस्तिकेतून सांगता आल्या तर ते लोकांनाही पटेल, असे मला वाटायचे. शेवटी अनिष्ट प्रथा या आपल्याच मूळावर उठणाऱ्या असतात. त्याने आजवर अनेक बळी गेलेत. त्यामुळे याला पायबंद घालणारा कायदा व्हायलाच हवा. दाभोळकर जे सांगत होते, त्यापेक्षाही जहाल भाषेत माझे आजोबा प्रबोधनकार लिहायचे. त्यांचाही चुकीच्या प्रथांना कडाडून विरोध होता, असे राज यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages