अण्णांनी भ्रष्टाचारी व्यक्तींकडून घेतला पाहुणचार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अण्णांनी भ्रष्टाचारी व्यक्तींकडून घेतला पाहुणचार

Share This

अण्णांनी भ्रष्टाचारी व्यक्तींकडून घेतला पाहुणचार, अमेरिकन आयोजकांवरच आरोप

मुंबई - भ्रष्टाचाराविरोधात रान उठवून देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा नुकताच झालेला अमेरिका दौरा वादाच्या भोव-यात सापडला आहे. तिथे अण्णांनी भ्रष्टाचारी व्यक्तींकडून ‘पाहुणचार’ घेतल्याचे समोर आले आहे. या दौ-याचे आयोजक  फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनच्या (एफआयए) सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यापैकी सर्वेश धारियन यांना अमेरिकी न्यायालयाने 2.3 दशलक्ष डॉलर भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोषी ठरवले होते, तर ‘एफआयए’चे अध्यक्ष नीरव मेहता यांना 2005 मध्ये गुजरातमधील एका गुन्ह्याप्रकरणी अटक झाली होती.ही सर्व पार्श्वभूमी माहीत असतानाही अण्णांनी हा पाहुणचार स्वीकारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.  

अण्णा हजारे यांनी 16 ऑगस्ट ते 29 ऑगस्टदरम्यान न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, सॅनफ्रान्सिस्को आदी शहरांना भेटी दिल्या. या ठिकाणी त्यांच्या सभाही झाल्या. अण्णांचा  हा दौरा प्रामुख्याने ‘एफआयए’ने व इतर काही संस्थांनी आयोजित केला होता. या दौ-याचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर लगेचच सर्वेश धारियन आणि नीरव मेहता यांची पार्श्वभूमी पुढे आली होती. त्यामुळे अमेरिकेतील काही मंडळींनाच अण्णांनी या दौ-याचे निमंत्रण स्वीकारू नये, असे वाटत होते.  

अण्णांचे मौन !
अमेरिकेच्या वादग्रस्त दौ-याबाबत ‘दिव्य मराठी’ने अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांच्या स्वीय सहायकांमार्फतही निरोप पाठविण्यात आला, मात्र अण्णांकडून कोणतेही उत्तर आले नाही.

काय आहेत आरोप ?  
व्यावसायिक हितसंबंध जपले जावेत म्हणून आठ जणांनी जुलैमध्ये मॅनहॅटनच्या मेडिकल कंपनीला 2.3 दशलक्ष डॉलर लाच देऊ केली. त्यातील एक व्यावसायिक धारियन होते. त्यांना न्यू जर्सीत अटकही झाली होती. या प्रकरणाचा तपशील अमेरिकन न्यायव्यवस्थेच्या वेबसाइटवर आहे. तर गुन्हेगारी आरोपांनंतर नीरव यांनी गुजरातमधून पळ काढला. 2005 मध्ये मुंबईत त्यांना अटक झाली होती. त्यामुळे भ्रष्टाचार निपटण्यासाठी  संपूर्ण सरकारी यंत्रणा वेठीस धरणा-या अण्णांनी अमेरिकेत मात्र या भ्रष्टाचारी लोकांचे  निमंत्रण कसे स्वीकारले, असा सवाल विचारला जात आहे.

माहिती मिळाली होती : विश्वंभर चौधरी  
अण्णांसोबत अमेरिका दौ-यावर गेलेल्या विश्वंभर चौधरी यांना याबाबत विचारले असता त्यांनी या दोघांच्या पार्श्वभूमीबद्दल आपल्याला निनावी पत्र आल्याचे मान्य केले. मूळचे औरंगाबादचे असलेल्या डॉ. सचिन नरवडे यांच्या आमंत्रणावरून अण्णांनी हा दौरा स्वीकारला होता. त्यांनाच या प्रकरणाची  शहानिशा करण्यास सांगितल्याचेही चौधरी म्हणाले. त्यावर ‘एफआयए’ने भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या सर्वेश धारियन आणि नीरव मेहता यांना काढून टाकल्याचे सांगितले गेले. अण्णांनी येथील संस्थांकडून कोणतीही आर्थिक मदत स्वीकारलेली नाही, असेही चौधरी म्हणाले. मात्र, या संपूर्ण दौ-याचा खर्च कोणी केला, असे विचारले असता, प्रामुख्याने ‘एफआयए’ने व विविध शहरांमधला खर्च त्या-त्या संस्थांनी केल्याचेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages