दलित विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दलित विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या

Share This
मुंबई-नाशिक महामार्गावर रास्ता रोकोमुंबईत छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित बनलेली असतानाच शुक्रवारी शहापूर तालुक्यातील सावरोली गावात संतापदायी घटना उघडकीस आली. येथील दलित विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली व तिचा मृतदेह जवळच्याच झुडपात फरफटत नेऊन फेकल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे संतप्त झालेल्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-नाशिक महामार्गावर 'रास्ता रोको' करून घटनेचा तीव्र निषेध केला.

मुंबईतील शक्ती मिलच्या कम्पाऊंडमध्ये छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचे अद्यापि पडसाद उमटत आहेत. ती घटना ताजी असतानाच शहापूरमधील दलित विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या झाल्याची घटना शुक्रवारी उजेडात आली. पीडित विद्यार्थिनी प्रणाली संजय गायकवाड ही अंबरनाथ येथील आयटीआयमधून सावरोली गावातील आपल्या घरी परतत होती. त्याच वेळी नराधमांनी वाटेत गाठून तिच्यावर पाशवी बलात्कार केला व तिचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत झुडपात फेकून दिला.

इलेक्ट्रिकची कामे करणारे संजय गायकवाड हे संसारगाडा कसाबसा चालवतात. दोन मुलगे व दोन मुलींच्या शिक्षणासाठी ते प्रसंगी मोलमजुरीही करतात. १२ उत्तीर्ण झालेली त्यांची मुलगी 
प्रणाली हिने पुढे तंत्रशिक्षण घेण्याच्या हेतूने अंबरनाथ येथील आयटीआयमध्ये प्रवेश घेतला होता. ती नेहमी आईसमवेत घरी परतत असे. गुरुवारी ती घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यासाठी आईवडील घराबाहेर पडले होते. त्या वेळी एका व्यक्तीने त्यांना प्रणालीचा मृतदेह झुडपात असल्याचे सांगितले. तिच्या मृतदेहाजवळ पाण्याची बाटली, पर्स, रेल्वेचा पास व टाटा इंडिकॉमचे सिमकार्ड पडले होते.

या घटनेप्रकरणी शहापूर पोलिसांनी अज्ञात नराधमांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्या नराधमांची शोधमोहीम सुरू ठेवली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या आरपीआय कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मुंबई-नाशिक महामार्गावर 'रास्ता रोको' करून घटनेचा निषेध नोंदवला. १९ वर्षीय दलित विद्यार्थिनीवर पाशवी बलात्कार करणार्‍या नराधमांना तातडीने पकडण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्या आरपीआय कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान, रिपाइं नेते रामदास आठवले हे शनिवारी शहापूरला भेट देऊन बळित मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी सरकारकडे करणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages