रिपाइं पक्षाच्या बैठकीत झालेल्या वादावरून नगरसेवक भगवान भालेराव व त्यांच्या चार-पाच साथीदारांनी पक्षाच्याच कार्याध्यक्षावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी नगरसेवक भगवान भालेराव व त्यांच्या साथीदारांविरुद्ध मारहाण व लूटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाचे नगरसेवक भगवान भालेराव यांनी उल्हासनगर-१ येथील साधुबेला शाळेजवळील एका सभागृहामध्ये पक्षाची बैठक गुरुवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित केली होती. या बैठकीत भाग घेण्यासाठी रिपाइंचे शहर युवक कार्याध्यक्ष अनिस अर्जुन धनवे (३३) हेदेखील उपस्थित होते. शहरातील नवीन कार्यकारिणी या वेळी जाहीर करण्यात येणार होती. या मुद्दय़ावरून धनवे व भालेराव यांच्यात मतभेद झाले. यामुळे भालेराव संतप्त झाले व रागाच्या भरात आपले साथीदार विक्की करोतिया व इतर चार-पाच जणांना धनवे यांना मारहाण करण्याची चिथावणी दिली. आरोपींनी धनवे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत धनवे यांची सोन्याची चेन, मोबाइल व रोख रक्कम लंपास झाल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे.
या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी भगवान भालेराव, विक्की करोतिया व अन्य चार-पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भगवान भालेराव यांना विचारणा केली असता अनिस धनवे यांना मारहाण झाली तेव्हा मी जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांच्यासह कार्यक्रमाच्या बैठकीत होतो. युवा कार्यकर्त्यांचा आरडाओरडा चालू असल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार घडल्याचे मला कळले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

No comments:
Post a Comment