मुंबईला विविध साथींच्या आजारांची घेरले आहे. डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू इत्यादी आजार दर पावसाळ्यात डोके वर काढत असतात. यंदाही या आजारांनी मुंबईच्या अनेक भागात आपले बस्तान बसवले असून या आजारांनी लोक हैराण झाले आहेत. स्वाइन फ्लूचा पहिला आणि डेंग्यूचा चौथा बळी मुंबई परिसरात गेल्यानंतरही मुंबईकरांवर असलेली साथीच्या रोगांची धास्ती कमी झालेली नाही. मागील काही महिन्यांपासून तापाने फणफणलेल्या मुंबईचा ‘ताप’ कमी होण्याचे नाव घेत नसून तापाचा आजार अधिकच बळावत आहे.
जुलै महिन्यांच्या तुलनेतच ऑगस्ट मध्ये तब्बल १,८३६ ने तापाच्या रुग्णांत वाढ झाली असून हा आकडा आठ हजारापर्यंत गेला आहे.मुंबईत जुलै महिन्यांत तापाच्या ६,२६४ रुग्णांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ८,१०० रुग्णांची नोंद महापालिका रुग्णालयांत झाली आहे. मलेरियाच्या रुग्णांचा आकडाही १३०० वर गेला असून डेंग्यूच्या आजाराने हातपाय पसरले आहेत. ऑगस्टमध्ये २१ रुग्णांना ग्रासले असून स्वाइन फ्लूच्या रुग्णांत कमालीच वाढ झाली आहे. जुलैमध्ये स्वाइन फ्लूचे केवळ दोन रुग्ण आढळले असले तरी ऑगस्टमध्ये तब्बल दहा रुग्णांत वाढ झाली आहे.
टायफॉईडच्या रुग्णांतही वाढ झाली असून १५२च्या तुलनेत २०६ रुग्ण आढळून आले आहेत. ग्रॅस्ट्रोच्या रुग्णांत घट होऊन ती अडीच हजारांवरून एक हजारावर आली आहे. काविळच्या रुग्णांत मात्र वाढ झाली असून ती १५२ च्या तुलनेत ऑगस्टमध्ये तब्बल १७७ झाल्याचे महापालिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. मुंबईत साथीच्या आजारांनी बदलत्या हवामाना बरोबरच आपलेही प्रताप दाखवायला सुरुवात केली आहे. मलेरिया आणि डेंग्यू फैलावण्याचे कारण म्हणजे डासांचा वाढता फैलाव आहे. या डासांच्या फैलावाकडेच नव्हे, तर सर्वच आरोग्य सेवांकडे पालिका अधिका-यांचे दुर्लक्ष होत असल्याने हे आजार पसरण्याची अधिक भीती आहे.
डेंग्यूचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळून आले असून आतापर्यंत ६१ रुग्णांची नोंद झाली आहे. गोरेगावमधील शास्त्रीनगर भागात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. मुंबईत अजूनपर्यंत डेंग्यूने दोन बळी घेतले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाची साथ असून त्याचा सर्व तपशील उपलब्ध झालेला नाही. गोरेगावातील सिद्धार्थ रुग्णालयात मात्र डेंग्यूचे १५, मलेरियाचे २६, टायफाइडचे सहा, व्हायरल फिव्हरचे १२ व लेप्टोच्या एका रुग्णाची नोंद झाली आहे.
मलेरिया आणि डेंग्यूचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे डासांची वाढती संख्या व त्यांच्या वाढीला पोषक असे वातावरण व परिस्थिती. मुंबईतील वाढता बकालपणा, अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य यामुळे डासांची पैदास कमालीची वाढत आहे. डासांची पैदास होण्याचे मुख्य कारण म्हणजे ठिकठिकाणी साचणारे पाणी. पण लोक या साचणा-या पाण्याकडे लक्ष देत नाहीत. उघडया गटारांत, रस्त्यांच्या कडेला तसेच इमारतींच्या गच्च्यांवरील कुंडयांमध्ये, भांडयांमध्ये, टाकून दिलेल्या टायरमध्ये साचून राहिलेल्या पाण्यात डास अंडी घालतात. या अंडयांतून आठ दिवसात डास बाहेर पडतात. मुंबईत इमारतींची बांधकामे बाराही महिने सुरू असतात. या बांधकामांच्या ठिकाणी असलेल्या टाक्यांमध्ये पाणी साठवलेले असते. त्यामुळेही डासांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होतो.
पालिका ‘पाणी साठवू नका, डासांची उत्पत्ती रोखा’ अशा जाहिराती वृत्तपत्रातून देत असली तरी असे पाणी साठवणा-या लोकांविरुद्ध आणि बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करत नाही. महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. बांधकाम व्यावसायिक बांधकामांच्या ठिकाणी पाणी साठवून ठेवतात. पण त्याबाबतच्या नियमांचे जराही पालन करत नाहीत, याकडे पालिका अधिकारी ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करतात. रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या गाडया व स्टॉल्स याकडेही पालिका अधिकारी लक्ष देत नाहीत.
स्टॉलवाले तेथे कचरा टाकण्यासाठी कचरापेटी ठेवतातच असे नाही. कचरापेटी ठेवणारा तो कचरा योग्य ठिकाणी टाकण्याची तसदी घेत नाही. हे स्टॉलवाले व गाडीवाले आपले काम आटोपल्यावर आपली भांडी तेथेच धुतात. रात्री शहरातील टपोरी ठिकठिकाणी मद्यपान व खानपान करतात आणि उरलेले पदार्थ व कागदी डिशेस तेथेच टाकून जातात. मुंबईत ठिकठिकाणी टाकलेला, साचलेला कचरा व्यवस्थितपणे उचलला जात नाही. कचरा उचलणारे कंत्राटदार याबाबतीतही हेराफेरी करतात. त्यांचे पालिका अधिकारी आणि नगरसेवक यांच्याशी असलेले ‘कंत्राट’च या स्वच्छतेच्या व आरोग्याच्या प्रश्नाआड येत आहे.
शहराच्या अनेक भागात मिळणा-या दूषित पाण्यामुळेही लोक आजारी पडत आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासूनच अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने गॅस्ट्रोचा पादुर्भाव वाढला. जूनमध्ये पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुमारे ६०० रुग्ण दाखल झाले होते. विक्रोळी, चेंबूर, दक्षिण-मध्य मुंबई, डोंगरी या परिसरात गढूळ व दूषित पाण्याच्या अनेक तक्रारी होत्या याबाबत भूमिगत जलवाहिन्यांमध्ये गढूळ व दूषित पाणी जाते व त्यामुळे हा दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे असा पालिकेने खुलासा केला होता.
विशेष बाब म्हणजे विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांबाबत व मृतांच्या संख्येबाबत पालिका निश्चित आकडेवारी देत नाही. आरोग्य खात्याच्या अधिका-यांची या आकडेवारीबाबत नेहमीच लपवाछपवी चालू असते, हे प्रसारमाध्यमांनी अनेक वेळा दाखवून दिले आहे. अनेक रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात दाखल न होता खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होतात. काही रुग्ण घरीच उपचार घेतात. या सर्व रुग्णांची माहिती महापालिकेकडे नसते.
पालिका रुग्णालयांमधील रुग्णाना औषधपुरवठा वेळेवर होत नसल्याची आणखी एक समस्या आहे. रुग्णांना वेळेवर औषधपुरवठा व्हावा म्हणून दर वर्षी कोटयवधी रुपयांची तरतूद केली जाते तरी औषध पुरवठयाबाबत ही स्थिती का निर्माण होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेने मुंबईकर नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून योग्य अशी पाऊले उचलण्याची गरज आहे.
- साथीचे आजार जुलै ऑगस्ट
- ताप ६२६४ ८१००
- मलेरिया १२६२ १३०२
- लेप्टो २४ १६
- डेंग्यू ६६ ८७
- चिकुनगुनिया ०६ ००
- एच१एन१ ०२ १०
- गॅस्ट्रो २६०४ १०६५
- हेपेटायटिस १५२ २०६
- टायफॉईड १५२ २०६
- कॉलरा ४४ १९
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:
Post a Comment