सत्ताधारी महिला नगरसेविकांच्या छळवणुकीचे सभागृहात पडसाद - सभा तहकूब - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 January 2014

सत्ताधारी महिला नगरसेविकांच्या छळवणुकीचे सभागृहात पडसाद - सभा तहकूब

8/1/2014 http://jpnnews.webs.com 
मुंबई : सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकांची वरिष्ठ नेत्याकडून होणारी बदनामी तसेच छळवणूक प्रकरणाचे तीव्र पडसाद मंगळवारी सभागृहात उमटले. याबाबत एका काँग्रेसच्या नगरसेविकेला हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यास महापौरांनी नकार दिल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालून तसेच महापौरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून सभागृह अक्षरश: दणाणून सोडले. या गदारोळातच महापौर सुनील प्रभू यांनी अनेक हरकतीचे मुद्दे निकाली काढले, मात्र विरोधकांच्या वाढत्या घोषणांमुळे कामकाज करणे अवघड झाल्याने महापौरांनी अखेर सभागृह तहकूब केले.

बोरिवलीच्या एका भाजपाच्या नगरसेविकेने एका अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्याची मागणी पालिकेकडे केली होती. त्यामुळे तेथील शिवसेनेच्या एका नेत्याचा अहंकार दुखावला. त्यावरून या भाजपाच्या नगरसेविकेची बदनामी तसेच तिचा मानसिक छळ सुरू झाला. या नेत्याच्या मनमानीचा फटका शिवसेनेच्या एका नगरसेविकेलाही बसला. या नेत्याकडून तिलाही मानसिक त्रास देण्याचे प्रयत्न सुरू झाले. अखेर ते प्रकरण चव्हाट्यावर आले. काँग्रेसच्या नगरसेविका वकारुन्नीसा यांनी मंगळवारी सभागृह सुरू होताच हरकतीचा मुद्दय़ाद्वारे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी आपल्याला संधी द्यावी, अशी मागणी केली. मात्र काही हरकतीचे मुद्दे निकाली काढायचे. तसेच या घटनेची सत्यता पडताळल्याशिवाय चर्चा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करून महापौरांनी त्यांना बोलायला नकार दिला. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेविकांनी महापौरांविरुद्ध घोषणा देत तेथे गोंधळ घातला. या गदारोळातच महापौरांनी कामकाज पुढे रेटल्यामुळे विरोधी पक्षाचे नगरसेवक आणखीनच आक्रमक झाले. त्यांनी फायली बाकावर आपटून वृत्तपत्र सभागृहात भिरकावले, तर मनसेचे दिलीप लांडे यांनी महापौरांसमोरील राजदंड पळवला. यावर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत याबाबत निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला तसेच महत्त्वाची कामे असल्याने शांत राहण्याचे आवाहन त्यांनी केले, मात्र विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्याने महापौरांनी अखेर सभागृह तहकूब केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS