मुंबई - मुंबईच्या तापमापकातील पारा आज ३८ अंश सेल्सिअसकडे सरकला होता. तरीही तमा न बाळगता मुंबईकरांनी मतदानासाठी केंद्रांबाहेर रांगा लावल्या. २००९च्या निवडणुकीपेक्षा १० टक्के अधिक म्हणजे सरासरी ५३ टक्के मतदान मुंबईत झाले. सकाळी ७ ते ९ या दोन तासांत मतदानाची टक्केवारी १०प र्यंत होती. नंतर हळूहळू सूर्य डोक्यावर येऊ लागला. मतदान थोडे रेंगाळले, पण अखेरच्या टप्प्यात मात्र मतदानाने वेग घेतला. २००९ च्या निवडणुकीत मुंबईत केवळ सरासरी ४३ टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र मतदानात तब्बल १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पहिल्या व दुसर्या टप्यात राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाले होते. आज तिसर्या व अखेरच्या टप्प्यात १९ मतदारसंघांत ५६ टक्के मतदान झाले. उर्वरित राज्यांच्या तुलनेत हे मतदान कमी असले तरी २००९ च्या निवडणुकीपेक्षा सर्वच मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी पाच ते पंधरा टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे राज्यात बदलाचे वारे वाहत असल्याचे स्पष्ट झाले असून वाढलेल्या टक्क्याचा आघाडीला धक्का बसणार अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. या टप्प्यात सर्वाधिक ६४ टक्के मतदान रायगड व दिंडोरी येथे झाले आहे, तर सर्वात कमी ४२ टक्के मतदान कल्याण मतदारसंघात झाले आहे.
मुंबई-दक्षिण ५४%, मुंबई- उत्तर ५२%, मुंबई उत्तर पश्चिम ५०%, मुंबई उत्तर-पूर्व ५३%, मुंबई उत्तर- मध्य ५५%, ठाणे ५२%, रायगड ६४%, नंदूरबार ६२%, धुळे ६१%, जळगाव ५६%, रावेर ५८%, जालना ६३%, औरंगाबाद ५९%, दिंडोरी ६४%, नाशिक ६०%, पालघर ६०%, भिवंडी ४३% आणि कल्याण ४३%.

