मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हणून बेस्ट ओळखली जाते. बेस्ट मधून ४३ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. मुंबईकर नागरिकांना बेस्टची सेवा मिळावी म्हणून बेस्टचे २६ हजार कर्मचारी उन्हाळा, पावसाळा, थंडी या तीनही ऋतू मध्ये अहोरात्र काम करत असतात. मुंबईकर नागरिकांना अहोरात्र सेवा देणाऱ्या या बेस्ट कर्मचाऱ्यांना मात्र कोणत्याही सोयी सुविधा मिळत नसल्याचे दिसत आहे.
मुंबई मध्ये बेस्टचे २६ डेपो कार्यरत आहेत, कित्तेक बेस्टच्या चौक्या आहेत ज्यामध्ये बेस्टच्या कर्मचारयाना आराम करण्यासाठी काही सुविधा प्रशासनाने दिल्या असल्याचे सांगण्यात येते. कर्मचाऱ्यांना प्रशासन काय काय सुविधा देते हे पाहण्यासाठी काही बेस्ट चे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांनी बेस्टच्या डेपो,टर्मिनल आणि चौक्यांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान चालक आणि वाहकांना कसल्याच सुविधा मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी बाकडी ठेवण्यात आली आहे, या बाकड्यांवर एखादा कर्मचारी जास्तीत जास्त १५ ते २० मिनिटे सुद्धा बसू शकत नाही. अशा बाकड्यांवर वाहक आणि चालकांना आपल्या ड्युटीमधून मिळालेल्या वेळे मध्ये आराम करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ असलेल्या बेस्टच्या चौकी मध्ये एका रूम मध्ये फक्त बाकड्यांवर ४ ते ५ कर्मचारी आराम करू शकतात. बाकीच्याना खाली जमीनिवर झोपून किवा बसून आराम करावा लागतो. एकाच वेळी भरपूर कर्मचारी आराम करण्यास आल्यास त्यांच्यासाठी आराम करायला जागाच नसल्याने त्यांना आराम करायला मिळत नाही.
दुसर्या रूम मध्ये शौचालय आहे या शौचालयाच्या बाजूलाच दुर्गंधीमध्ये कर्मचार्यांना आपला जेवणाचा डब्बा खावा लागतो. पाण्याचा नळ आणि टाकी आहे परंतु ती कधी साफच केली जात नाही. पाणी पिण्याच्या नळाजवळ स्वच्छता नसल्याने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना रोग राईला सामोरे जावे लागू शकते. आराम करण्यासाठी बनवलेल्या दोन्ही रूम मध्ये फ्यान फिरत आहेत परंतु हवा मात्र लागत नसल्याने चालक आणि वाहकांनी प्रचंड उकड्यामध्ये आराम कसा करायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेस्ट प्रशासनाकडून भिकारड्या स्वरूपाच्या सोयी दिली जात असल्याने कर्मचाऱ्यांना नाईलाजाने जवळच्या उद्यानामध्ये आराम करावा लागत आहे.
अशीच परिस्थिती सर्व डेपो, टर्मिनल, चौक्यांमध्ये आहे. कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने काही चौक्या आणि डेपो मध्ये उपहारगृहे बनवलेली आहेत. या उपहार गृहामध्ये चहा मागितल्यावर उकळलेले पाणी दिले जाते, चहा मध्ये दुध साखर आणि चहा पावडर टाकली कि नाही असा प्रश्न चहा पिणाऱ्या प्रत्तेकाला पडतो. बटाटे वडे आणि खाण्याच्या पदार्थाचा दर्जा इतका खालच्या पातळीचा असतो तरीही बेस्ट मधील अधिकारी आणि समिती मधील सदस्य उपहारगृह चालकाच्या विरोधात ब्र सुद्धा काढत नाहीत. मग अशा लोकांवर कारवाही कशी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नुकताच एप्रिल महिन्यात बेस्ट कर्मचाऱ्यांनी क्यानेडीयन वेळापत्रक मान्य नसल्याचे सांगत संप पुकारला होता. या वेळापत्रकानुसार कर्मचाऱ्यांना ४ तास काम, ४ तास आराम आणि ४ तास पुन्हा काम करावे लागणार होते. कर्मचाऱ्यांना बेस्ट कडून दिल्या जाणाऱ्या सोयी डोळ्यांनी बघितल्यावर कोणताही कर्मचारी आराम करण्यासाठी राजी होणार नाही. बेस्टच्या संपाच्या काळात १२ तासाची ड्यूटी १० तासावर आण्यात आली आहे. पण जो मधला वेळ आराम करायला दिला जाणार आहे त्या वेळात आपल्या कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी चांगल्या सोयी सुविधा कशा मिळतील याबाबत प्रशासनाने कोणतीही योग्य भूमिका घेतलेली दिसत नाही.
१ जून पासून पुन्हा नवीन वेळापत्रक लावले जाणार असून या वेळापत्रकानुसार काम करण्याची सक्ती कर्मचाऱ्यांवर लादली जाण्याची शक्यता आहे. नवीन वेळापत्रकाची घाई करणारे बेस्ट प्रशासन कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा द्यायला मात्र उशीर करत आहे असेच म्हणावे लागेल. कर्मचाऱ्यांना दर्जेदार सोयी सुविधा दिल्या तरच कर्मचारी सुद्धा प्रवाशांना दर्जेदार सोयी सुविधा देतील आणि बेस्टचे उत्पन्न वाढे याकडे मात्र वातानुकुलीत कार्यालयात बसणारे बेस्ट समितीचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजून घेवून त्यावर त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांच्या आत जो असंतोष प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या विरोधात खदखदत आहे, या असंतोषाचा स्फोट व्हायला जास्त वेळ लागणार नाही याची नोंद घेण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३



No comments:
Post a Comment