मुंबई / अजेयकुमार जाधव (http://jpnnews.webs.com)
आघाडी सरकार सत्तेवर असताना दलितांवर अत्याचारामध्ये वाढ झाली असल्याने गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जेष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांनी केली. त्या नगर येथील नितीन आगे हत्याकांडा संदर्भात सत्यशोधन अहवाल प्रसिद्ध करताना बोलत होत्या.
यावेळी बोलताना आघाडी सरकारला फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. या सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार होत असताना सरकारमध्ये सहभागी पक्षच आरोपींना पाठींबा देत असल्याने असे अत्याचाराची प्रकरणे वाढत असल्याचे जोशी म्हणाल्या.
नितीन आगेच्या हत्तेचा तपास योग्य रीतीने होत नाही यामुळे योग्य तपास करून खऱ्या आरोपींना शिक्षा व्हायला हवी. नगर मध्ये सोनई येथे मागील वर्षी सफाई कामगारांचे हत्याकांड झाले. त्याची केस उज्ज्वल निकम यांच्यासारखे वकील देवूनही केस आजही सुरूच आहे, अद्याप याचा निकाल लागलेला नाही. यामुळे अशा केसेस नगर बाहेर चालवाव्यात अशी मागणी सुबोध मोरे यांनी केली.
शक्ती मिल, निर्भया प्रकरणासारखे जलद निकाल अट्रोसिटी प्रकरणात लागत नसल्याने असे सर्व खटले जलद गती न्यायालयात चालवावे, दर सहा महिन्यांनी अशा प्रकरणांचा आढावा घ्यावा, ज्या शाळेत नितीन आगेचे प्रकरण घडले त्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना सह आरोपी करावे, इत्यादी मागण्यांसाठी येत्या २० मे ला दादर स्टेशन ते चैत्यभूमी मोर्चा काढणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. केंद्रामध्ये सरकार बदलले असल्याने आता अट्रोसिटीच्या प्रकरणात वाढ होणार अशी भीती ज.वि.पवार यांनी व्यक्त केली.
