सोशल मीडियाची जादू यशस्वी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 May 2014

सोशल मीडियाची जादू यशस्वी

मुंबई : निवडणुकीत 'साम, दाम आणि दंड, भेद' या अस्त्राचा वापर नेहमी केला जातो; परंतु यंदाची १६वी लोकसभा निवडणूक ही 'सोशल मीडिया'च्या जादूमुळे विशेष गाजली. निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच भाजपाकडून या क्षेत्राचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला गेला अन् सोशल मीडियाची जादू ही यशस्वी झाल्याचे दिसून आले; परंतु सुरुवातीपासून टीकेचे धनी झालेले काँग्रेस आणि त्यांचे नेते निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीसुद्धा टार्गेट राहिले अन् अक्षरश: त्यांच्यावर टीकेचा पाऊस पडला. 

१६ वी लोकसभा निवडणूक ही अनेक कारणांनी स्मरणीय ठरली. यंदा सर्वच पक्षाच्या वतीने प्रचाराच्या जोरदार रणधुमाळी गाजवल्या होत्या. परंतु त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर हा प्रामुख्याने करण्यात आला होता. फेसबुक, व्हॉट्सअँप, ट्विटर यांसारख्या अनेक सोशल मीडियांवर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अक्षरश: उमेदवारांच्या प्रचाराचा आणि विरोधकांवर टीकेचा भडिमार होत होता; परंतु भाजपाने सुरुवातीपासूनच या क्षेत्रावर वर्चस्व गाजवत प्रचारात आघाडी घेतली होती. सरकारविरोधी टीकेची धार अधिक तीव्र करत मंत्र्यांचे भ्रष्टाचार आणि त्यांच्याकडून न झालेल्या कामांचा पाढा सोशल मीडियावर वाचला जात होता. पंतप्रधानांपासून सर्वच मंत्र्यांचे व्यंगचित्रात्मक जोक्स आणि त्यांची टिंगल करणारी विधानेदेखील यामध्ये विशेष गाजली.

भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करणारे अपडेट सातत्याने लोड केले जात होते. त्यासाठी भाजपाकडून सोशल मीडिया सेलची विशेष स्थापना करण्यात आली होती. हिंदी तसेच प्रादेशिक चित्रपटातील गाणी, हिट ठरलेले डायलॉग्ज तसेच चित्रपटांच्या पोस्टरवर एडिट करून मोदींचा केलेला प्रचार यामुळे सोशल मीडिया पूर्णपणे मोदीमय झाली होती. अखेरीस या क्षेत्राचा प्रभाव जाणवला अन् भाजपाची जादू दिसून आली. निवडणुर्कीपूर्वी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातदेखील अनेक मतदारसंघांमध्ये सोशल मीडियाचा प्रभाव जाणवणार असल्याचे दिसून आले होते. ही बाब खरी ठरली असून सोशल मीडियाची जादूदेखील मोदींच्या विजयाचे एक कारण ठरले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS