बेस्टच्या विश्‍वासार्हतेला तडा गेल्याने बँकांचे कर्ज नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 May 2014

बेस्टच्या विश्‍वासार्हतेला तडा गेल्याने बँकांचे कर्ज नाही

कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यास विलंबच होणार - महाव्यवस्थापक 
मुंबई : दिवसेंदिवस वाढणारा आर्थिक तोटा आणि घटणारे उत्पन्न यामुळे बेस्टचा आर्थिक गाडा चालवणे बेस्ट प्रशासनाला अशक्य होत चालले आहे. बेस्ट प्रशासनावर असलेले कर्ज पाहता कोणतीही बँक पुन्हा कर्ज देण्यास तयार नसल्यामुळे कर्मचार्‍यांचे पगार देण्यास बेस्ट प्रशासनास विलंब होत आहे. सध्या बेस्टची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे बेस्टला बँका कर्ज देण्यास उत्सुक नाहीत, परिणामी बेस्टची विश्‍वासार्हता कमी होत असल्याचे यावरून दिसून येत आहे.


बेस्ट उपक्रमाची ३१ मार्च २0१३ रोजी संचित तूट ही ३,८८३.६७ कोटी रुपये इतकी आहे, तर १ मेपर्यंतचे कर्जदायित्व हे २,९८0.७0 कोटी रुपये इतके आहे. तसेच टाटा पॉवर कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या विजेच्या देयकाची मार्च-एप्रिल या दोन महिन्यांची थकबाकी २८४.३५ कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे उपक्रमाला ३,२६५.0५ कोटी रुपये देणे आहे. एप्रिल महिन्याचा पगार बेस्ट कर्मचार्‍यांना २0 मे रोजी देण्यात आला. त्याला खरे कारण हे कॅश फ्लो होता, असे बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी बुधवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेमध्ये सांगितले.

बेस्टची सध्याची आर्थिक स्थिती, या विषयावर बेस्ट समितीमध्ये चर्चा करण्यात आली. या वेळी बेस्ट समितीचे सदस्य (शिवसेना) सुनील गणाचार्य यांनी बेस्ट प्रशासनाने उत्पन्न वाढीचे विविध उपाय राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगत 'क' वर्गात (सर्वाधिक तोट्यात) येणारे बसमार्ग बंद करण्याची सूचना केली. तसेच विजेच्या बिलांची १00 टक्के वसुली करण्यास प्राधान्य देण्यात यावे, वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या शनिवार-रविवारच्या सुट्टय़ा रद्द करण्यात याव्यात, वीज गळती आणि चोरी थांबविण्यात यावी, बसचे किलोमीटर वाढविण्यात यावेत, अशा अनेक उपाययोजना सुचविल्या. या सूचनांवर बोलताना बेस्ट समितीचे सदस्य (काँग्रेस) शिवाजी सिंह यांनी बेस्टचे मार्ग बंद करण्यास विरोध क रत बस डेपोंचा वापर कर्मशिअल बाबींसाठी करण्यात यावा, अशी सूचना केली. त्याचबरोबर सध्या बेस्टच्या बसेसचे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, ते कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यास सांगितले.

या चर्चेला उत्तर देताना बेस्टचे महाव्यवस्थापक गुप्ता यांनी बेस्ट उपक्रमामध्ये २0१0 पासून कॅश फ्लोची परिस्थिती असल्याचे सांगितले. बेस्टची आर्थिक स्थिती सुधारेल, या आशेने बेस्टला बँका कर्ज देत होत्या, परंतु एप्रिल महिन्यात झालेला २ दिवसांचा संप पाहता बँकांची बेस्ट उपक्रमावरील विश्‍वासार्हता कमी झाली आहे. त्यामुळे बँका बेस्ट उपक्रमाला कर्ज देण्यास तयार नसल्याचे सांगितले. तसेच या कॅश फ्लोमुळे येत्या २-३ महिन्यांत कर्मचार्‍यांचा पगार हा २ तारखेलाही होऊ शकतो अथवा २0 तारखेलाही होऊ शकतो, असे स्पष्ट संकेतही या वेळी गुप्ता यांनी दिले.

पुढील ३ महिन्यांची बेस्टची आर्थिक परिस्थिती (शॉर्टफॉल)
जून : ६0२९३ कोटी रु.
जुलै : ११0४१ कोटी रु.
ऑगस्ट : ९२९८ कोटी रु.
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS