मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होणार

Share This
मुंबई - मराठा आरक्षणाचा निर्णय 21 जूनपर्यंत घेतला जाईल, असे स्पष्ट आश्‍वासन मराठा आरक्षणाचा अभ्यास करणाऱ्या समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी दिले होते. मात्र, अद्यापही मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात सरकारला अपयश आल्याने मराठा संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. मराठा महासंघाने सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा आज निर्णय घेतला. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत संभाजी ब्रीगाडचे महाराष्ट्र अध्यक्ष मनोज आखरे यांनी सरकारच्या दिरंगाईविरोधात संताप व्यक्‍त केला. 


बुधवारपर्यंत (ता.25) राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा; अन्यथा मराठा महासंघ रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन उभारेल, असा इशारा मराठा महासंघाने दिला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाला विरोध केला नसला तरी हा निर्णय घेण्यात अकारण वेळकाढूपणा केला जात असल्याची टीका मराठा महासंघाने केली. लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याअगोदर मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, असे सरकारने आश्‍वासन दिले होते. त्यानंतर राणे समितीने मुख्यमंत्र्यांना अहवाल सोपवला. मंत्रिमंडळ बैठकीत या अहवालाला तत्त्वत: मान्यता देण्यात आली. मात्र, अजूनही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नसल्याने मराठा संघटनांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages