रेल्वेमध्ये महिला सुरक्षेसाठी ५00 होमगार्ड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेमध्ये महिला सुरक्षेसाठी ५00 होमगार्ड

Share This
मुंबईच्या उपनगरी रेल्वेतून प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षेसाठी गृह विभागाने शुक्रवारी महत्त्वाचे पाऊल उचलले असून महिला सुरक्षेसाठी ५00 होमगार्ड तैनात करण्याचा निर्णय गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी घेतला आहे.मुंबईतील मध्य, पश्‍चिम आणि हार्बर मार्गावरील उपनगरी रेल्वेतून प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. महिलांसाठी आरक्षित डब्यांमधून प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षेसाठी ५00 होमगार्ड तैनात करण्याचा निर्णय मंत्रालयात गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ, गृहरक्षक व नागरी संरक्षण दलाचे महासमादेशक जावेद अहमद, उपमहासमादेशक सुरिंदरकुमार, गृह विभागाचे सचिव विनीत अग्रवाल, रेल्वेचे पोलीस आयुक्त प्रभातकुमार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नव्याने तैनात केले जाणारे ५00 होमगार्ड हे चोवीस तास उपनगरी रेल्वेत सुरक्षेसाठी कार्यरत राहणार असून दिवसा २00 आणि रात्री ३00 जवान रेल्वेतील महिला सुरक्षेची जबाबदारी पार पाडणार आहेत. गृहमंत्र्यांच्या निर्देशानंतर गृहरक्षक व नागरी संरक्षण दलाच्या समादेशक कार्यालयाकडून ५00 होमगार्ड तैनात करण्याचे आदेश रात्री जारी करण्यात आले आहेत. मुंबईच्या उपनगरी रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेवर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विशेष लक्ष पुरवले असून अनेकदा चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनस आदी रेल्वे स्थानकांमध्ये अचानक भेटी देऊन महिला सुरक्षेच्या उपाययोजनांची पाहणी केली होती.

आज ५00 होमगार्ड तैनात करण्याच्या निर्णयामुळे महिला सुरक्षेला मोठे बळ उपलब्ध झाले असून मध्य, पश्‍चिम आणि हार्बर मार्गावरून रेल्वेने प्रवास करणार्‍या महिलांचा प्रवास सुरक्षित होणार असल्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितले. रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यापूर्वीच सुरू केलेल्या ९८३३३३११११ हेल्पलाईनला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये महिला प्रवाशांसाठी मदत-सहाय्य कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकांवर कायमस्वरूपी महिलांच्या आरक्षित डब्यांसमोर पोलीसदेखील तैनात असल्याचे आर.आर. पाटील यांनी सांगितले.
     

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages