नितीन इवलेकरच्या मृत्यूला जबाबदार कोण ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नितीन इवलेकरच्या मृत्यूला जबाबदार कोण ?

Share This
अंधेरी पश्चिम येथील लक्ष्मी इंडस्ट्रीयल येथून जवळ असलेल्या लोटस बिझनेस पार्क या २२ मजली इमारतीला शुक्रवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास आग लागली होती. हि आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे २१५ कर्मचारी ३१ अधिकारी २० फायर इंजिन, १२ ट्याण्कर, ९ रुग्णवाहिका, ४ उंच शिड्या, ८ वॉटर जेट यांच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. दोन तास अथक परिश्रम करून जवान आगीशी झुंज देत होते. परंतू  आग वेगाने पसरू लागल्यामुळे दुपारी साडेबाराच्या सुमारास "ब्रिगेड कॉल‘ जाहीर करून अन्य अग्निशामक केंद्रांना, तसेच भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, आरसीएफ व राज्याच्या अग्निशमन यंत्रणेची मदत मागवून सायंकाळी ४ वाजता आग विझवण्यात आली. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी जवळपास सहा तास आगीशी झुंज देत होते. या आगीमध्ये गंभीर जखमी झालेल्या चार जवानांना नवी मुंबईतील एरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 20 जवानांना विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
आग आटोक्‍यात आणण्यासाठी मुंबई अग्निशामक दलाचे 33 जवान इमारतीच्या 21 व्या मजल्यावर गेले होते. आग नेहमी वरच्या बाजूला पसरत जाते परंतू इमारतीमध्ये आत इलेक्ट्रिकच्या वायरीनी पेट घेतल्याने आग वरच्या मजल्यावरून खाली पसरत गेली. अचानक 20 व्या मजल्यावरून आगीचा भडका उडाला. त्यामुळे हे सर्व जवान २१ व्या मजल्यावर अडकले. त्यातील नितीन इवलेकर यांच्यासह काही जवान मोठ्या धैर्याने वरच्या मजल्यावर गेले. मात्र, थोड्या वेळात तेथेही आग पसरू लागल्यामुळे अग्निप्रतिबंधक गणवेश असतानाही आगीच्या ज्वाळांनी घेरल्याने नितीन इवलेकर या जवानाचा मृत्यू झाला. आगी इतकी भयानक होती कि या आगी मध्ये पाण्याचा फवार मारणारा पाईप, जवानांचे हातातील मोजे आणि पायातील गमबूट सुद्धा वितळले होते. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीशी झुंज देण्यसाठी एका विशिष्ट प्रकारचा सूट दिला जातो असा सूट असतानाही कित्तेक जवान आगी मध्ये होरपळून निघाले आहेत. 

इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरील अग्निशमन दलाच्या जवानांना बाहेर काढण्यासाठी २२ मजल्या पर्यंत पोहोचू शकते अशी ७० मीटर उंचीची ८ करोड २५ लाखांची एकमेव शिडीची गाडी खराब झाली आहे. हि गाडी फिनलंड या देशामधील कंपनीकडून विकत घेण्यात आली होती. हि गाडी रिपेरिंग करण्यास ३ कोटीचा खर्च सांगण्यात आला असल्याने आणि या कंपनीची सेवा भारतामध्ये नसल्याने हि गाडी दुरुस्त नव्हती. यामुळे इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत अडकलेल्या सुटका करण्यासाठी दुपारी १ वाजू २० मिनिटांनी नौदल आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरना बोलावण्यात आले. दुपारी २. ३० ला आलेल्या नौदलाच्या हेलिकॉप्टरने गच्चीवरील काही जवानाना रस्सीच्या सहाय्याने बाहेर काढून जवळच्या मैदानात उतरवले. परंतू त्याच दम्यान आग विझल्याने बाकीच्या अडकलेल्या जवानांना जिन्यावरून खाली आणण्यात यश आले. आग वेळेवर विझली नसती आणि हेलिकॉप्टर उशिरा आली असती तर अडकलेले सर्वच जवान मृत्यूमुखी पडले असते. 

मुंबई मध्ये काचेने वेढलेल्या इमारती बांधण्याचे फ्याड निर्माण झाले आहे. यातील एक इमारत लोटस हि सुद्धा इमारत होती. काचेच्या इमारतींमध्ये आग लागल्यास आग विझवणे जिकरीचे आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावर बेतू शकते. लोटस इमारती मध्ये काचांमधून आगीचा धूर बाहेर जायला मार्ग नसल्याने धूर इमारतीच्या आत मध्ये पसरल्याने तसेच आगी मुळे काचा वितळून फुटू लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत होत्या. अग्निशमन दलाची सर्वात उंच अशी ७० मीटर शिडी असलेली गाडी बिघडली असल्याने या गाडीची उणीव आग विझवताना दिसली. ४२ मीटर आणि ६५ मीटरच्या शिड्या असलेल्या गाड्यांनी आग विझवण्याची जबाबदारी जवानांना पार पाडावी लागली. अग्निशमन दलाच्या कित्तेक गाड्यांवर कर्मचारी नसल्याने जवळच्या जिल्ह्यामधून आणि इतर प्रशासनाच्या अग्निशमन गाड्या बोलावाव्या लागल्या. यामध्ये कित्तेक वेळ वाया गेल्याने आग विझवायला वेळ लागला आहे. असे प्रकार या आधी सुद्धा घडले आहेत तरीही मागील प्रकरणांतून पालिकेने अश्या इमारतींवर कोणताही अंकुश ठेवलेला नाही. 

अंधेरीची लोटस इमारत व्यावसायिक कार्यालये असलेली इमारत होती. या इमारतीमध्ये प्रतिष्ठित अश्या सिने कलावंत आणि चित्रपट निर्मात्यांची कार्यालये होती. सुप्रसिद्ध आशय व्यक्तींची कार्यालये असलेल्या इमारतीची काळजीही घेणे गरजेचे होते. परंतू या इमारतीमध्ये आग प्रतीबंधक उपकरणे लावली असली तरी आग लागली त्यावेळी हि उपकरणे पूर्णपणे निकामी झाली असल्याचे उघड झाले आहे. दोन वर्षापूर्वी मंत्रालयाला आग लागल्या नंतर सगळीकडे बोंबाबोंब करून फायर ऑडीट करून घेणे सक्तीचे करण्यात आले असले तरी या इमारतीचे फायर ऑडीट करून घेतलेले नव्हते असे समोर आले आहे. फायर ऑडीट करून घेतले नसल्याने इवलेकर यांचा मृत्यू झाल्यानंतर अग्निशमन दलाला आणि पालिकेला जाग आली असून इमारतीमधील संबंधितांवर कारवाही करणार असल्याचे जाहीर केले आहे. 


नितीन इवलेकर यांच्या मृत्यू नंतर पालिकेने आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीला नोकरी देण्याचे जाहीर केले आहे. अग्निशमन दलाचे या आधीही काही जवान आग विझवताना मृत्युमुखी पडले आहेत. परंतू अश्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना जाहीर केलेली रक्कम वर्षानुवर्षे मिळालेली नाही. असा अनुभव असल्याने इवलेकर यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार देत लेखी आश्वासन देण्याची मागणी केली होती. इवलेकर यांचा मृत्यू अग्निशमन दलाच्या चुकांमुळे आणि सुविधा नसल्याने झाल्याचा आरोप केला आहे. इवलेकर यांचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेत नसल्याचे समजताच मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना लेखी आश्वासन देवून एक महिन्यात आर्थिक मदत आणि पत्नीला नोकरी देण्याचे मान्य करावे लागले आहे. इवलेकर यांच्या कुटुंबीयांनी आणि विविध युनियनने केलेला आरोप खरा आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना चान्फ्ल्या प्रतीच्या सुविधा आणि वस्तू पुरवल्या असत्या तर आज जवान आगी मध्ये होरपळून निघाले नसते आणि इवलेकर यांचा म्र्युतुही झाला नसता. 

अग्निशमन दलाच्या जवानांना आणि अधिकार्यांना सूट, हात मोजे, गमबूट इत्यादी लागणाऱ्या वस्तू विकत घेण्यासाठी कंत्राट दिली जातात. कंत्राट दिली जाताना वस्तूच्या क्वालिटी पेक्षा आपली टक्केवारी कशी मिळेल हे पाहिले जाते. अशी कंत्राटे पालिकेच्या स्थायी समिती मध्ये मंजूर केली जातात. कित्तेक वेळा जवानांना  दिल्या जाणाऱ्या वस्तू चांगल्या प्रतीच्या नसल्याची ओरड केली जात असली तरी तिकडे दुर्लक्ष करून निकृष्ठ प्रतीच्या वस्तू मागवल्या जातात. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि स्थायी समितीने चांगल्या प्रतीच्या वस्तू जवानांना मिळवून दिल्या असत्या तर आज २१ जवान आगीमध्ये होरपळून निघाले नसते आणि इवलेकर यांचा जीव सुद्धा वाचला असता. अग्निशमन दलाने लोटस इमारतीने फायर ऑडिट वेळेवर केले नाही म्हणून त्यांच्यावर वेळीच कारवाही केली असती तर आज अशी वेळ आलीच नसती. पालिकेनेही काचेने वेढलेल्या इमारतींबाबत वेळीच धोरण जाहीर केले असते तर आज इवलेकर कुटुंबीयांवर अशी वेळ आलीच नसती. 

लवकरच लोटस इमारतीवर पालिका आणि अग्निशमन दल कारवाही करेल. लोटस इमारतीच्या सेक्रेटरी विरुद्ध एफआयआर सुद्धा दाखल केला जाईल. परंतू पालिका आणि अग्निशमन दल यांच्या चुकांबाबत कोणाला दोषी धरले जाणार आहे. इवलेकर यांच्या प्रमाणे कित्तेक जवान आग विझवताना मृत्यूमुखी पडले आहेत अश्या या मृत जवानांना खरोखरच न्याय द्यायचाच असेल तर निकृष्ट दर्जाच्या वस्तू पुरवणाऱ्या कंत्राटदारापासून हि कंत्राटे मंजूर करणाऱ्या स्थायी समिती पर्यंत सर्वांनाच दोषी ठरवावे लागेल. इमारतीचे फायर ऑडीट झाले नाही म्हणून कारवाही न करणाऱ्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर कारवाही करावी लागेल. आग लागल्यास काचेच्या इमारतीमध्ये लोकांचा मृत्यू होतो हे माहित असतानाही अश्या इमारतींना परवानगी देणाऱ्या आणि अश्या इमारती उभ्या राहू नये म्हणून लवकर पॉलिसी न बनवणाऱ्या अश्या सर्वच पालिका अधिकाऱ्यांवर कारवाही करावी लागेल. या सर्वांवर जेव्हा दोष सिद्ध करून कारवाही केली जाईल तेव्हाच नितीन इवलेकर आणि इतर मृत जवानांना खरोखर न्याय मिळेल. 

अजेयकुमार जाधव  (मो. ९९६९१९१३६३)

शहीद जवान नितीन यांना 'गार्ड ऑफ ऑनर'

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages