लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वांचे सहकार्य आवश्‍यक - सुरेश शेट्टी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वांचे सहकार्य आवश्‍यक - सुरेश शेट्टी

Share This
मुंबई - लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात कुटुंब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. लोकांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री सुरेश शेट्टी यांनी आज येथे केले. 
जागतिक लोकसंख्या नियंत्रण दिनानिमित्त शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रधान सचिव श्रीमती सुजाता सौनिक, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. के. एच. गोविंदराज, आयुक्त श्रीमती सीमा व्यास, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ. व्ही. खानंदे, श्रीमती अनुजा गुलाटी आदी मान्यवर उपस्थित होते. 

शेट्टी म्हणाले, राज्यातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण 1981-1991 या दशकात 25.73 टक्के होते, ते 2001-2011 या दशकात 15.99 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाल्याचे दिसून येते. पाच वर्षांतील जन्मदर व अर्भक मृत्यू दराचा आढावा घेतल्यास त्यामध्येही घट असल्याचे दिसून येते. हा राज्यात राबविण्यात येत असलेल्या कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या यशाचा भाग आहे. 

एक किंवा दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांचे प्रमाण राज्यात वाढत आहे. 2013-14 या वर्षात ते 64 टक्‍क्‍यांपर्यंत आले आहे. 1 किंवा 2 मुलींनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्य रेषेखालील जोडप्यांसाठी "सुधारित सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना‘ राबविण्यात येत आहे. 2013-14 या वर्षात 1630 लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच तीन कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. 27 जून ते 10 जुलै 2014 दरम्यान दाम्पत्य संपर्क पंधरवडा 11 जुलै ते 24 जुलै 2014 दरम्यान लोकसंख्या स्थिरता पंधरवडा पाळण्यात येतो. या पंधरवड्यात उपलब्ध कुटुंबनियोजन पद्धतींबाबतचे प्रदर्शन, कुटुंबनियोजनाच्या सुविधा पुरवणारी विशेष आरोग्य शिबिरे घेतली जातात, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.

लक्षणीय कामगिरीबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य रक्त संक्रमण परिषदेस जागतिक रक्तदाता दिनानिमित्त 14 जून रोजी राष्ट्रीय पातळीवर अतिउत्कृष्टतेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे, असे सांगून शेट्टी यांनी सुरक्षित प्रसूती, प्रसवपूर्व गर्भलिंग निदान चाचणीस प्रतिबंध, बालमृत्यू दरात घट याबद्दल केंद्र सरकारकडून राज्याला 4 पुरस्कार प्राप्त झाले आहेत, तसेच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, ब्लड ऑन कॉल, आपत्कालीन वैद्यकीय सेवा या योजना राज्यात प्रभावीपणे राबविल्या जात आहेत, असेही शेट्टी यावेळी म्हणाले. 

सर्वात जास्त बाळंतपणे झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व "आशा‘ कर्मचाऱ्यांनी बाळंतपणासाठी संस्थेमध्ये प्रवृत्त केल्याबद्दल "आशा‘ कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages