नरेंद्र मोदींची हवा ओसरतेय - राज ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2014

नरेंद्र मोदींची हवा ओसरतेय - राज ठाकरे

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपविरोधी भूमिका घ्यायला सुरवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावरील हवा आता ओसरत चालली आहे, असं मत खुद्द राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये यशवंत नाट्यगृहात आज मनसे विद्यार्थी सेनेचा मेळावा पार पडला. या वेळी राज ठाकरे यांनी मोदीविरोधी सूर आळवला. 
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या या भूमिकेला भाजपनेही विरोधी सूर लावला होता. राज यांच्या भूमिकेमुळे शिवसेना-भाजप युतीत कटुता निर्माण झाली होती. तरीही राज ठाकरे यांनी मोदी हेच विकासपुरुष असल्याचे नमूद करून त्यांच्याशिवाय देशाला चांगले दिवस येणार नसल्याचे अनेक सभांमधून जाहीर केले होते. मोदी यांचे सरकार सत्तेवर येऊन जेमतेम महिनाच उलटला असताना सोशल मीडियावर मोदी यांच्यावर वैयक्‍तिक आणि मोदी सरकारवर टीका होऊ लागली आहे. रेल्वे तसेच पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ झाल्यामुळे सोशल मीडियाने मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. म्हणजेच सोशल मीडिया जेवढा फलदायी असतो, त्यापेक्षा अनेक पटींनी त्रासदायक असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले. त्यामुळे राज्यकर्ते किंवा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी याचा विचारपूर्वक वापर करायला हवा, असे मत राज यांनी या वेळी व्यक्‍त केले. 

सोशल मीडिया साईटचा मोदींना प्रचारात उपयोग झाला; मात्र प्रत्येक वेळेसच सोशल मीडियाचा उपयोग होईल, असे नाही. तसेच एके काळी सोशल मीडियावर मोदींचे गुणगान गाणारे आता त्यांच्याबद्दल विनोद पसरवत असल्याचं राज यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे आता सोशल मीडियावर मोदींना मिळणारा पाठिंबा कमी होत असल्याकडे राज यांनी लक्ष वेधले. 

लॉंच करायला अमित काही रॉकेट नाही मेळाव्याला राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेही उपस्थित होता. पण अमित ठाकरेला राजकारणात उतरवण्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले. "अमितला लॉंच करण्यासाठी तो काही रॉकेट नाही,‘ अशी प्रतिक्रिया या वेळी राज यांनी दिली. तसेच तो योग्य वेळी राजकारणात येईल, असेही राज यांनी या वेळी सांगितले. विद्यार्थी सेनेच्या मेळाव्याला अमित ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे आधीच ठरले होते. त्यामुळे अमित याच्या राजकारणातील प्रवेशाबाबत मनसेत चर्चा सुरू होती; मात्र राज यांनी या मुद्‌द्‌यावर तूर्तास काहीही प्रतिक्रिया दिली नाही. 

Post Bottom Ad

JPN NEWS