केंद्रीय मंत्रीपदासाठी पुन्हा आठवले सक्रिय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केंद्रीय मंत्रीपदासाठी पुन्हा आठवले सक्रिय

Share This

मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीच्या वेळी मंत्रीपदाची संधी हुकल्यानंतर रिपब्लकिन पार्टीचे नेते रामदास आठवले यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रीपद मिळवण्याचे प्रयत्न चालवल्याचे समजते. विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जागावाटप ठरवण्यासाठी सोमवारी महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत आपली काय भूमिका राहील, हे ठरवण्यासाठी रिपब्लिकन नेत्यांची रविवारी आठवले यांच्या उपस्थितीत एम.सी.ए. सभागृहात बैठक झाली. अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, सुमंतराव गायकवाड आदी सर्व प्रमुख पदाधिकारी या वेळी हजर होते. रिपब्लिकन पक्षाला केंद्रात काहीही वाटा मिळालेला नाही. नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे लोकसभा निवडणुका जिंकता आल्या असल्या तरी विधानसभा निवडणुकीत तसे चित्र नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला दुर्लक्षून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न शिवसेना आणि भाजपाने केल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अनेक वक्त्यांनी या वेळी दिल्याचे समजते. 


या बैठकीत विधानसभेच्या २८८ जागांपैकी रिपब्लिकन पक्षाला अनुकूल असलेल्या जागांचा आढावा घेण्यात आला. अशा ६0 जागा पक्षाच्या नेत्यांनी निश्‍चित केल्या असून त्यात १५ ते १६ जागा आरक्षित प्रवर्गातील आहेत. या ६0 पैकी किमान २0 जागा तरी पक्षाला मिळाल्या पाहिजेत. त्याबाबतीतही तडजोड करायची असल्यास केंद्रीय सत्तेत वाटा, वेगवेगळ्या समित्या, महामंडळे, राज्यपालपद अशा मार्गाने रिपब्लिकन पक्षाचा सन्मान राखला जावा, असे या बैठकीत ठरले. महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत या दृष्टीने प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी रविवारी त्यांच्याबरोबरही या दृष्टीने चर्चा केल्याचे कळते.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages