मुंबई - पालिकेकडून दुर्लक्ष केले गेल्याने घाटकोपरच्या लक्ष्मीनगरमधील राजाराम बने रस्त्याचे काम काही वर्षांपासून रखडले असून रस्त्याचे गटार झाले आहे. त्याबाबत पत्रव्यवहार करूनही पालिकेचे अधिकारी दाद देत नसल्याने आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका राखी जाधव यांनी पाणी साचलेल्या रस्त्यावरच आंदोलन केले. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारी २१ जुलैला पालिका कार्यालयात कोणत्याही अधिकाऱ्यांना जाऊ देणार नाही. पालिका अधिकाऱ्यांना कार्यालयात "नो एंट्री‘ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राजाराम बने रस्त्याबाबत दोन वेळा निविदा काढूनही ती रद्द का करण्यात आली, असा सवाल जाधव यांनी प्रशासनाला केला. प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच या रस्त्यात पावसाचे पाणी साचले आहे. शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना तेथून ये-जा करणे अडचणीचे झाले आहे. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. या रस्त्याचे काम तातडीने हाती घ्या, अशी मागणी करत आज साचलेल्या पाण्यात जाधव यांनी आंदोलन केले. सहायक आयुक्त आणि उपायुक्तांनी भेटीचे सौजन्य दाखवले नाही. त्यांनी सहायक आयुक्तांना चर्चेसाठी पाठविले. पावसाळा संपताच या रस्त्याचे काम सुरू करतो आणि पावसाळ्याचे दोन महिने या रस्त्याची आम्ही देखभाल करू, असे आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली, असा आरोप जाधव यांनी केला. हे आश्वासन म्हणजे नागरिकांची थट्टा असल्याचे त्या म्हणाल्या. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी २१ जुलैला घाटकोपर-अंधेरी जोडरस्त्यावर "रास्ता रोको‘ केल्यानंतर पालिकेच्या एन विभाग कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात येतील आणि अधिकाऱ्यांना "नो एंट्री‘ करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
