मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई मधील रस्त्या रस्त्यावर गल्ली बोळातून चायनीज फूड विकले जाते. या चायनीजमध्ये मोठ्या प्रमाणात "अजिनोमोटो' हे घातक केमिकल वापरले जाते. यामुळे कर्करोग, हाडे ठिसूळ होणे, किडनी आणि यकृताचा त्रास होण्यासारखे आजार भेडसावत असल्याने 'अजिनोमोटो' वापरण्यावर पालिकेने बंदी घालावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली आहे.
"अजिनोमोटो' मुळे एकीकडे सरती आणि पुरुषांना कर्करोग, हाडे ठिसूळ होणे, किडनी आणि यकृताचा त्रास होण्यासारखे आजार भेडसावत असतानामहिलांमध्ये असंतुलनाचे प्रमाण वाढून महिलांना कर्करोगाचा धोका अधिक वाढतो. महिलांना पाळीची अनियमितता, तरुणपणीच वयात आल्यासारखे दिसणे याचा सामना करावा लागत आहे. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे महिलांच्या स्त्रीबीज निर्मितीवरही परिणाम होत असल्याने त्यांच्यात वंध्यत्वासारख्या आजारानेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. महिलांच्या ग्रंथींना सूज येणे, पाळीची अनियमितता, चिडचिड यांसारख्या आजारांचा त्यांना सामना करावा लागतो. कर्करोगाबरोबरच यकृत व किडनीला त्रास होणे, मेंदूवर परिणाम होण्याचाही धोका असतो. स्त्रीबीज कोषावरही त्याचा परिणाम होऊन वंध्यत्व येण्याचे प्रमाण वाढते.
सामान्य मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याशी खुले आम खेळ केला जात असताना मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस कारवाही होत नाही. यामुळे मुंबईकर नागरिकांना 'अजिनोमोटो' सारख्या रसायनापासून वाचवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने 'अजिनोमोटो'वर बंदी घालावी अश्या मागणीचा ठराव पालिका सभागृहामध्ये मांडणार असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
