मुंबई - डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर पालिकेने धोकादायक इमारतींची माहिती गोळा करण्यास सुरूवात केली. मात्र, गेली दोन वर्षे धोकादायक स्थितीत असलेल्या पालिकेच्या कुलाबा शाळेकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष झालेले दिसते. परिणामी, इमारतीचा भाग कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. परंतु, पालिका प्रशासनाने या शाळेला केवळ धोकादायक नोटीस पाठवून आपली जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे धोकादायक इमारतीत भरणार्या शाळेत विद्यार्थांना पाठवायचे की नाही या भीतीने मन खचत असल्याची भावना येथील पालकवर्गाने व्यक्त केली.
मुंबईत पालिका शाळांची संख्या कमी होऊन एकीकडे विद्यार्थीसंख्येला गळती लागलेली असताना कुलाब्यातील पालिका शाळांमधील सात हजार विद्यार्थी धोकादायक इमारतीत शिक्षण घेत आहेत. दक्षिण मुंबईतील सर्वात मोठी पालिका शाळा म्हणून या शाळेची ओळख आहे. सात भाषिक शाळा या इमारतीत भरत असून ही शाळा पालिकेने धोकादायक घोषित केली आहे. तर, या शालेय इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यास नेमण्यात आलेल्या समितीने केवळ एका नजरेतच शाळा धोकादायक असल्याचे ठरविल्याचे शिक्षण समितीत स्पष्ट झाले होते.याबाबत स्थानिक नगरसेवक ऍड. मकरंद नार्वेकर यांनी महापालिका सभागृह आणि शिक्षण समितीच्या बैठकीत आवाज उठविला. मात्र, महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांचा धाक नसल्याने या शाळेचा मुद्दा अजून तडीस लागलेला नाही. परिणामी, शाळेची इमारत कोसळण्याची पालिका वाट पाहतेय का, असा सवाल येथील रहिवाशी आणि पालकवर्ग व्यक्त करीत आहेत.
पालिकेने शाळेच्या इमारतीशेजारील चतुर्थश्रेणी कामगारांच्या इमारती तसेच अग्निशमन दलाच्या निवासस्थानाच्या इमारतींचे दोनवेळा स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांना धोकादायक ठरविले. या इमारतींपेक्षा कुलाबा शाळेची इमारत जुनी आहे. इमारतीच्या छताला आणि भिंतीला तडे गेल्याने तिची अवस्था दयनीय झाली आहे. दीड वर्षापासून या इमारतीची दुरुस्तीची मागणी केली जात असताना अद्याप कोणतीही कार्यवाही पालिकेकडून होत नसल्याची खंत नार्वेकर यांनी व्यक्त केली.
माझा मुलगा तिसरीच्या वर्गात शिकतो आहे. शाळेची दयनीय अवस्था पाहून मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, अशी भीती मनात सतत येत असते - रुपाली माशिलकर, पालक
इमारतीच्या भिंतीला तडे गेले आहेत. काही ठिकाणी छताचा भागही कोसळला आहे. टेरेसमधून गळती लागलेली असल्यामुळे मुलांची पुस्तके खराब होत आहेत. जिन्यांची देखील दुरावस्था झाल्याने मुलांना शाळेत पाठविणार तरी कसे? - अशोक काकड, पालक
