मुंबई – तुम्ही तुमच्या वाहनावर पत्रकार, पोलिस, डॉक्टर असे ‘स्टिकर’ लावून बिनधास्त मिरवणार असाल तर सावधान! तुमच्यावर पोलिस कधीही कारवाई करू शकतात. काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस ही कारवाई करणार आहेत. पुण्यातील पोलिस ठाण्याबाहेर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या मोटरसायकलमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या वाहनावर ‘पोलिस’ असे लिहिण्यात आले होते. महत्त्वाच्या व्यक्ती असल्याचे भासवून दहशतवादी संधी उठवत असल्याचे लक्षात आल्याने पोलिस असे ‘स्टिकर’ लावण्यावर बंदी घालणार आहेत. शिवाय, खासगी वाहने पोलिस ठाणे परिसरात आणण्यासही बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ-११चे पोलिस उपायुक्त बाळसिंग राजपूत यांनी दिली.
परिमंडळ-११ मध्ये समाविष्ट बोरिवली, चारकोप, गोराई, एमएचबी, कांदिवली, मालवणी, मालाड, बांगुरनगर आणि गोरेगाव या पोलिस ठाण्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस आणि सरकारी वाहनांनाच केवळ पोलिस ठाणे परिसरात परवानगी असल्याचे फलकही संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत.
संबंधित पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनादेखील त्यांची खासगी वाहने पोलिस ठाणे परिसरात उभी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पोलिस, पत्रकार आणि अन्य सरकारी कर्मचा-यांचे स्टिकर लावण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेशही राजपूत यांनी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यांना दिले आहेत. या नियमाच्या अंमलबजावणीकरता पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर २४ तास पोलिस कर्मचा-याची नेमणूक करण्यात आली आहे.
