मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा वेळीच बंदोबस्त करा - महापौर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा वेळीच बंदोबस्त करा - महापौर

Share This
मुंबई शहरात व उपनगरात सध्या भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून सर्वसामान्य नागरिकांना या भटक्या कुत्र्यांमुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागते. नागरिकांना होणाऱया या त्रासाचा प्रशासनाने चोख बंदोबस्त करावा, असे आदेश महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिले आहेत.

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज (दिनांक २३ सप्टेंबर २०१४) महापौर दालनात गटनेत्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी बोलताना महापौर स्नेहल आंबेकर पुढे म्हणाल्या की, शहराच्या सर्व भागात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवांमुळे श्वान दंशाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. विशेषतः लहान मुलांना यापासून बचाव करणे प्रत्येक कुटुंबियांना जिकीरीचे वाटत आहे, तेव्हा प्रशासनाने या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी महापौर आंबेकर यांनी दिल्या.

तसेच श्वानदंशाच्या औषधोपचाराबाबत आधुनिक पद्धत आलेली असून त्या पद्धतीचाही सखोल अभ्यास करून ती पद्धत अंमलबजावणीच्या दृष्टीनेही प्रशासनाने कार्यवाही करावी. सदर विषय संदर्भात ए, बी व ई प्रभाग समितीचे अध्यक्ष मनोज जामसुतकर यांनी महापौरांना पत्र देऊन न्यायालयीन बाजू व्यवस्थित मांडण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी केली होती. याबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात आदेश आज महापौरांनी प्रशासनाला दिले.

यावेळी उप महापौर अलका केरकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, भाजप गटनेते मनोज कोटक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते संदीप देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते धनंजय पिसाळ, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) राजीव जलोटा, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) एस. व्ही. आर. श्रीनिवास, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) मोहन अडताणी हे उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages