राज्य माहिती आयोगाचे आदेश
मुंबई - मुंबई पालिकेमध्ये दक्षता विभाग असून या विभागामार्फत अनेकवेळा कारवाई केली जाते परंतू या केलेल्या कारवाईची माहिती मात्र लपवली जाते. माहिती अधिकारातून सदर माहिती मागूनही दिली जात नसल्याने हि माहिती व केलेल्या कारवाईचा अहवाल पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा आदेश राज्य माहिती आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या दक्षता विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईची माहिती मुंबईकर जनतेला सहज उपलब्ध होणार आहे.
मुंबई मध्ये विविध ठिकाणी विकास कामे होत असतात अशीच कामे पालिकेच्या डी विभागात करण्यात आली होती याची माहिती व दक्षता विभागाने केलेल्या कारवाईची माहिती निशांत घाडगे यांनी केली होती. परंतू पालिकेच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी सार्वजनिक प्राधिकरणाची साधन सामुग्री मोठ्या प्रमाणात वळवावी लागेल असे कारण देत माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. या प्रकरणी घाडगे यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपील दाखल केले असता राज्य माहिती आयुक्त अजितकुमार जैन यांनी विकासकामांची संपूर्ण माहिती, दक्षता विभागाने केलेल्या तपासणीचा अहवाल, कामातील त्रुटी, कंत्राटदारावरील कारवाई असा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करा, असा आदेश दिला आहे. माहिती आयोगाच्या या आदेशामुळे आता मुंबईकर नागरिकांना त्यांच्या विभागात होणारी कामे, त्या कामांचे कंत्राटदार कोण आहेत, दक्षता विभागाने कोणावर कश्याप्रकाराची कारवाई केली याची संपूर्ण माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर मिळणार आहे.