उपचारांचा खर्च रेल्वेकडून वसूल करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2014

उपचारांचा खर्च रेल्वेकडून वसूल करा

मुंबई - रेल्वे अपघातांतील जखमींवर मुंबई महापालिका उपचार करीत असल्याने त्याचा खर्च पालिकेने रेल्वेकडून वसूल करावा, असा ठराव महासभेत मांडण्यात आला आहे. प्रवाशांकडून रेल्वे "सुरक्षित आकार‘ वसूल करते; मात्र अपघात झाल्यास उपचाराचा खर्च दिला जात नाही. महापालिकेच्या रुग्णालयांत जखमींना दाखल करून रेल्वे प्रशासन हात वर करते. त्यामुळे या जखमींवरील उपचारांचा खर्च पालिकेने रेल्वेकडून वसूल करावा, असे या ठरावात म्हटले आहे. 


घाटकोपर येथे रेल्वेतून पडून दोन हात गमावलेल्या मोनिका मोरेच्या उपचारांसाठी रेल्वेने हात आखडते घेतले होते. महापालिकेने मोनिकाच्या उपचारांचा खर्च केला. रेल्वे अपघातातील सर्वच जखमींबाबत रेल्वे प्रशासन कोणतीही जबाबदारी घेत नाही. मासिक पासधारक आणि तिकीटधारकांकडून रेल्वे प्रशासन सुरक्षित आकार वसूल करते. हा आकार वसूल करूनही रेल्वे प्रशासन अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी कोणतीही तरतूद करीत नाही, असे शिवसेनेचे नगरसेवक प्रा. अवकाश जाधव यांनी निदर्शनास आणले. 

अपघातग्रस्तांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात येते, परंतु उपचाराचा खर्च रेल्वे प्रशासन देत नाही. त्यांच्या उपचारावर पालिकाच खर्च करते. रेल्वे अपघातांतील जखमींवर उपचार करण्यासाठी खर्च करणे रेल्वेला बंधनकारक आहे, त्यामुळे जखमींच्या उपचारांचा खर्च रेल्वेकडून वसूल करावा, असे प्रा. जाधव यांनी महासभेत मांडलेल्या ठरावात म्हटले आहे. 

Post Bottom Ad